भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळत नाहीये. खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या रोहितने स्वतःला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. पण खरं तर रोहितला संघातून वगळण्यात आले आहे.
रोहितने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ५ डावात ३१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १० आहे. दरम्यान आता रोहित शर्माच्या समर्थनार्थ जगातील दुसरा सर्वात वेगवान धावपटू उतरला आहे. या धापटूचे नाव योहान ब्लॅक आहे.
ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य पदके जिंकणाऱ्या योहान ब्लॅक याने रोहित शर्माबद्दल ट्विट केले आहे. त्याने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले की, या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी उत्सुक आहे. इतरांनी काहीही म्हटले तरी रोहितने आपला खेळ सुरूच ठेवला पाहिजे, असे माझे मत आहे. खेळात खराब फॉर्म येत राहतो. रोहितने तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, अशी माझी सूचना आहे. तसेच शर्मा एक असाधारण कर्णधार आहे.
त्याच्या पुढच्या पोस्टमध्ये त्याने रोहित शर्माचे नाव घेतले नसून हे देखील त्याच्यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्लॅकने लिहिले- भारत हे निःसंशयपणे माझे दुसरे घर आहे, येथील लोकांशी माझे घट्ट नाते निर्माण झाले आहे. मला खेळाचे अप्रत्याशित स्वरूप चांगले माहीत आहे. तथापि, भूतकाळात अपार आनंद देणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल".
जमैकाचा योहान ब्लॅक हा उसेन बोल्ट याच्यानंतर जगातील दुसरा वेगवान रेसर आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये ४x१०० मीटर प्रकारात दोनदा सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय २०१२ मध्ये त्याने १०० आणि २०० मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. एका मुलाखतीत बोल्टला विचारण्यात आले की त्याला कोणता खेळाडू आव्हान देतो आणि त्याने ब्लॅकचे नाव घेतले होते. ब्लॅक हा बालपणी वेगवान गोलंदाज होता आणि त्याला प्रथम क्रिकेटर बनायचे होते.