ट्रॅव्हिस हेड गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाचा सर्वात मोठा 'शत्रू' बनला आहे. ट्रॅव्हिस हेड याच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाला २०२३ च्या विश्वचषक आणि त्याच वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी गमवावी लागली होती.
आता ब्रिस्बेन कसोटीतही त्याने १५२ धावांची खेळी करत भारताला विजयापासून दूर ढकलले. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने हेडला त्याला बाद करण्याचे रहस्य विचारले. यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने खूप छान उत्तर दिले आहे.
सामन्यादरम्यानच्या मुलाखतीत हरभजन सिंगने ट्रॅव्हिस हेडला विचारले की, संपूर्ण भारताला तुझ्याविरुद्ध गोलंदाजी कशी करायची या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात रस आहे. हरभजनने असेही विचारले की, त्याला टीम इंडियाविरुद्ध इतक्या धावा करायला का आवडतात?
याला प्रत्युत्तर देताना हेडने सांगितले की, आपण ज्या प्रकारे ब्रिस्बेन कसोटीत खेळलो त्याचा अभिमान वाटतो.
ट्रॅव्हिस हेड म्हणाला, "मी हे आधीही सांगितले आहे, आम्ही भारताविरुद्ध इतकं क्रिकेट खेळले आहे की आम्ही यशाची ब्लू प्रिंट तयार करू शकतो. माझ्या मते टीम इंडिया खूप चांगल्या नियोजनासह आली होती, मला सुरुवातीला दडपण जाणवत होतं. पण दबावाच्या परिस्थितीत मी ज्या पद्धतीने शॉर्ट चेंडूंविरुद्ध खेळलो त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
ट्रॅव्हिस हेडने रवींद्र जडेजाचे उंच उसळणारे फिरकी चेंडू चांगले खेळू शकल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "माझी रणनीती पुन्हा एकदा यशस्वी झाली. जेव्हा मला आणखी एक संधी मिळेल, तेव्हा मी पुन्हा नव्याने सुरुवात करू इच्छितो."
या मालिकेत ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. सध्याच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
संबंधित बातम्या