भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे नाईट कसोटी ॲडलेड येथे खेळली जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेड याने शतक झळकावले आहे. त्याने १११ चेंडूत शतक पूर्ण केले.
ट्रॅव्हिस हेडच्या कसोटी कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे. तर भारताविरुद्धचे हे त्याचे तिसरे शतक ठरले. हेडने आतापर्यंत ॲडलेडमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. हे त्याचे आवडते मैदान देखील आहे. आतापर्यंत त्याने या मैदानावर ७ डावांत ३ शतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हे वृत्त लिहिपर्यंत ५ गडी गमावून २६७ हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांची भारतावर आतापर्यंत ८७ धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटचा धक्का २०८ धावांवर बसला होता. सध्या ॲलेक्स कॅरी आणि हेड मैदानावर आहेत.
टीम इंडिया पहिल्या डावात १८० धावांवर गारद झाली. यानंतर भारताच्या १८० धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पिंक बॉल कसोटीत चांगली सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. उस्मान खासजा १३ धावा करून बाद झाला. तो भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट २४ धावांवर पडली.
यानंतर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (७ डिसेंबर) जसप्रीत बुमराहने भारताला दुसरे यश मिळवून दिले. बुमराहने नॅथन मॅकस्विनीला (३९) धावांवर पंतच्या हाती झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरकार्डमध्ये आणखी १२ धावांची भर पडली आणि स्टीव्ह स्मिथही बुमराहच्या जाळ्यात येऊन पंतच्या हाती झेलबाद झाला.
स्मिथ बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी डाव पुढे नेला आणि धावसंख्या १६८ पर्यंत नेली, पण लॅबुशेन (६४) नितीश रेड्डीच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालकडे झेलबाद झाला. मिचेल मार्श (९) धावा करून अश्विनच्या चेंडूवर ऋषभ पंतकडे झेलबाद झाला.
आतापर्यंत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला तीन विकेट मिळवून दिले, तर नितीश रेड्डी आणि रविचंद्रन अश्विनला प्रत्येकी १ विकेट मिळाला.
संबंधित बातम्या