Travis Head Record In Gabba : टीम इंडिया आणिऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून तिसरा सामना शनिवारपासून (१४ डिसेंबर) ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर रंगणार आहे.
दरम्यान, ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेड भारतासाठी मोठी समस्या बनला होता. त्याने ॲडलेड कसोटीत १४० धावांची शानदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्याच्या या शानदार खेळीसाठी हेडला सामनावीराचा किताब देण्यात आला. मात्र गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत ट्रॅव्हिस हेड काही करू शकणार नाही. कारण गाबाच्या मैदानावरील त्याची आकडेवारी अतिशय वाईट आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मधील तिसरी कसोटी ब्रिस्बेन येथील गाबा येथे खेळवली जाईल. शनिवारपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेडची खराब आकडेवारी भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा देऊ शकते.
गाबा येथे खेळलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या शेवटच्या तीन कसोटी डावांवर नजर टाकली तर त्याला येथे खातेही उघडता आलेले नाही. हेडने गाबाच्या मैदानावरील त्याची शेवटची कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती, या कसोटीच्या दोन्ही डावांत तो शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, तो गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता.
यापूर्वी हेडने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सामना खेळला होता, ज्याच्या दुसऱ्या डावात तो शुन्यावर बाद झाला. हेडचा हा रेकॉर्ड भारतीय संघ आणि चाहत्यांना खूप आनंद देणारा असेल.
पण २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध गाबा येथे झालेल्या कसोटीत हेडने १५२ धावांची शानदार खेळी खेळली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावातही त्याने ९२ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत ट्रॅव्हिस हेड कधी काय करू शकेल, हे सांगता येणारे नाही.
ट्रॅव्हिस हेडने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५१ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ८४ डावांमध्ये त्याने ४३.२० च्या सरासरीने ३४१३ धावा केल्या आहेत. यात, त्याने ८ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १७५ धावा आहे.
संबंधित बातम्या