बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी रोमहर्षक स्थितीत पोहोचली आहे. टीम इंडियाने धमाकेदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दणका दिला आहे. विशेष म्हणजे आज (२९ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड याचा वाढदिवस आहे.
हेड त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर त्याचा वाढदिवस अजिबात चांगला गेला नाही. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच चेंडूवर हेडला बाद केले. हेड २ चेंडूत १ धाव करून आऊट झाला. विशेष म्हणजे ट्रॅव्हिस हेड बुमराह याच २०० वा कसोटी बळी ठरला.
बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही जसप्रीत बुमराह यानेच ट्रॅव्हिस हेडची शिकार केली होती. हेड पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. हेडने चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण चेंडू इनस्विंग होऊन बेल्सवर आदळला.
ट्रॅव्हिस हेड जबरदस्त फॉर्मात आहे. तो या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावात ४११ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटने दोन शतकेही झळकली आहेत. भारताविरुद्ध हेडचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८ बाद १६५ धावा केल्या असून त्यांच्याकडे आतापर्यंत २७० धावांची आघाडी आहे.
संबंधित बातम्या