ऑस्ट्रेलिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी झाला. या हाय स्कोअरिंग सामन्यात ऑस्ट्रेलियाने अगदी सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ट्रॅव्हिस हेड ठरला. त्याने आपल्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडला दणका दिला. इंग्लंडने या सामन्यात निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती, ट्रेव्हिस हेड निळ्या रंगाची जर्सी घालणाऱ्या संघांविरुद्ध नेहमीच चांगली फलंदाजी करतो, हे आतापर्यंत तरी घडले आहे.
विशेष म्हणजे, ट्रॅव्हिस हेडच्या या वादळी खेळीने भारतीय चाहत्यांना विश्वचषक २०२३ च्याअंतिम सामन्याची आठवण करून दिली. ज्यामध्ये ट्रॅव्हिसने १२० चेंडूत १३७ धावा करून ऑस्ट्रेलियाला एकट्याने विश्वचषक फायनल जिंकून दिली.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला ७ गडी राखून मोठा विजय मिळवून दिला.
नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने १२९ चेंडूत ११९.३८ च्या स्ट्राईक रेटने १५४ धावा केल्या. हेडची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक होती, ज्यामध्ये त्याने २० चौकार आणि ५ षटकार मारले.
यासह, तो इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे.
इंग्लंड -ऑस्ट्रेलिया सामन्यात काय घडलं?
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फिल सॉल्ट १७ धावा करून लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर बेन डकेट आणि विल जॅकने चांगली फलंदाजी करत डाव सांभाळला. जॅकने ६२ धावा केल्या, तर डकेटने ९५ धावांची शानदार खेळी केली. इंग्लंडच्या मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यांनी चांगली फलंदाजी केली असती तर इंग्लंडचा स्कोअर ४०० धावांपर्यंत पोहोचला असता. कर्णधार हॅरी ब्रूकने ३९ आणि जेमी स्मिथने २३ धावा केल्या. मजबूत स्थितीत दिसणारा इंग्लंडचा संपूर्ण संघ ४९.४ षटकांत ३१५ धावांत गडगडला.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. मिचेल मार्श १० धावा करून बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडने स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून ग्रीनसह डाव पुढे नेला. स्मिथ आणि ग्रीनने ३२-३२ धावा केल्या. त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी मिळून शानदार खेळी केली.
मार्नस लॅबुशेनने ६१ चेंडूत १२६.२३ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ७७ धावा केल्या. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाने ६ षटके शिल्लक असताना विजय मिळवला. हा सामना ७ विकेटने जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन - फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशॅग्ने, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, ॲरॉन हार्डी, शॉन ॲबॉट, बेन ड्वार्शुइस, ॲडम झाम्पा