Paris Olympics 2024 News: पॅरिस ऑलिम्पिकला येत्या २६ जुलै २०२४ पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण २०६ देश सहभागी होणार आहे. प्रतिष्ठेच्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने बुधवारी भारताच्या ११७ खेळाडूंची यादी जाहीर केली.या यादीत महाराष्ट्रातील १२ खेळाडू आहेत, ज्यात पॅरा ऑलिम्पिक खेळाडूंचाही समावेश आहे. या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, आभा खतुआ (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विष्णू सर्वनन (सेलिंग), स्वप्नील कुसाळे (नेमबाजी), प्रवीण जाधव (तिरंदाजी), मानसी जोशी, सुकांत कदम, भाग्यश्री जाधव (पॅरा बॅडमिंटन), सुयश जाधव (पॅरा स्विमिंग) आणि सचिन खिलारे (पॅरा ॲथलेटिक्स) यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, आभा खतुआने ऑलिम्पिक पात्रता मिळवूनही पथकात नाव न आल्याने आश्चर्य व्यक्त केले. ती क्रमवारीद्वारे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. तांत्रिक चुकीमुळे तिचे नाव या यादीत नाही की यामागे काही अन्य कारण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकूण ११७ भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली. ज्यात ॲथलेटिक्स- २९, नेमबाजी- २१, हॉकी- १९, टेबल टेनिस- ८, बॅडमिंटन-७, कुस्ती- ६, तिरंदाजी- ६, बॉक्सिंग-६, गोल्फ- ४, टेनिस- ३, जलतरण-२, नौकानयन- ३, अश्वारोहण-१, ज्युडो-१ आणि वेटलिफ्टिंग-१ यांचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली. या खेळाडूंना तयारीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये दिले जातील, अशी माहिती आहे. मात्र, राज्य सरकारने खेळाडूंना याआधीच पैसे द्यायला हवे होते, जेणेकरून या खेळाडूंना खेळांच्या तयारीसाठी त्याचा वापर करता येईल, अशा शब्दात एका अधिकाऱ्याने खंत व्यक्त केली.
पॅरिस ऑलिम्पिकला येत्या २६ जुलैपासून सुरू होत आहे. त्यानंतर ही स्पर्धा १६ दिवस चालणार आहे. या काळात अनेक सामने खेळवले जातील. या स्पर्धेचा समारोप ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकले. देशाचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये प्रथमच देशासाठी पदक जिंकले होते.