Tim Southee : रोहित शर्मासमोर टीम साऊदीनं षटकारांचा विक्रम मोडला, कमी सामने खेळून वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Tim Southee : रोहित शर्मासमोर टीम साऊदीनं षटकारांचा विक्रम मोडला, कमी सामने खेळून वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं

Tim Southee : रोहित शर्मासमोर टीम साऊदीनं षटकारांचा विक्रम मोडला, कमी सामने खेळून वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं

Updated Oct 18, 2024 12:59 PM IST

India Vs New zeland Test : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टीम साउथीने वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकले आहे. कमी सामने खेळून न्यूझीलंडच्या साउथीने सेहवागच्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

Tim Southee : रोहित शर्मासमोर टीम साऊदीनं षटकारांचा मोठा विक्रम मोडला, कमी सामने खेळून वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं
Tim Southee : रोहित शर्मासमोर टीम साऊदीनं षटकारांचा मोठा विक्रम मोडला, कमी सामने खेळून वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं (PTI)

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच कर्णधारपद सोडणाऱ्या टीम साऊदी याने बंगळुरू कसोटीत शानदार फलंदाजी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१८ ऑक्टोबर) टीम साऊथीने शानदारअर्धशतक झळकावले. तो ७३ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला.  या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले.

यासोबतच टीम साऊदी याने कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकले. वीरेंद्र सेहवागच्या नावावर कसोटीत १०४ सामन्यात ९१ षटकार होते, तर टीम साऊदीने १०३ सामन्यात ९३ षटकार ठोकले आहेत.

साऊदी फलंदाजीला आला तेव्हा मॅट हेन्रीची विकेट पडली होती आणि न्यूझीलंडची धावसंख्या २३३ धावा होती. इथून टीम साऊदीने भारतीय वंशाचा फलंदाज रचिन रवींद्रसोबत अप्रतिम फलंदाजी केली. टीम साउदीने मोहम्मद सिराजला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमवर मोठा षटकार मारून वीरेंद्र सेहवागला मागे टाकले.

सेहवागची प्रतिमा आक्रमक फलंदाज अशी होती. चौकारांपेक्षा जास्त षटकार मारण्यासाठी तो प्रसिद्ध होता, पण इथे वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टीम साऊदीने कमी सामन्यांमध्ये आणि कमी डावांमध्ये सेहवागला मागे टाकले आहे.

टीम साऊदीची ही १४८वी इनिंग आहे तर ओपनिंग करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत १०४ सामन्यांमध्ये फलंदाजी केली. षटकार मारण्याच्या बाबतीत टीम साऊदी सेहवागपेक्षा वेगवान ठरला. 

इथे आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे टीम साउदीच्या नावावर कसोटीत एकही शतक नाही, तर वीरेंद्र सेहवागच्या नावावर २३ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा ब्रायन लाराही साऊदीच्या मागे आहे. त्याच्या नावावर १३१ सामन्यात ८८ षटकार आहेत. 

दरम्यान, कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने १३१ षटकार ठोकले आहेत. तर भारतीय कर्णधार रोहितच्या नावावर सध्या ८७ षटकार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या