बांगलादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होणार असून, पहिला सामना रावळपिंडीत आणि दुसरा सामना कराचीमध्ये होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक अनोखा निर्णय घेत, तिकिटांचे दर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
वास्तविक, पीसीबीने मैदानातील प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत फक्त ५० रुपये आहे आणि स्टेडियममधील ठिकाणांनुसार किंमत वाढेल.
कराची येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये तिकिटाची किंमत ५० रुपयांपासून सुरू होते. तर प्रीमियम अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी कमाल तिकिटाची किंमत २.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
दुसरीकडे, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना तिथे खेळवला जाणार आहे. येथे तिकिटाची किंमत २०० रुपयांपासून सुरू होते. चाहत्यांसाठी गॅलरी पासची सुविधाही देण्यात आली आहे. गॅलरी पासची किंमत २,८०० रुपये ठेवण्यात आली असून हा पास खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जेवण आणि चहाची सुविधाही दिली जाणार आहे.
प्लॅटिनम बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला १२५०० रुपये मोजावे लागतील. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला रावळपिंडी स्टेडियममध्ये सर्व सुविधांचा आनंद घ्यायचा असेल तर त्याला एका सीटसाठी २ लाख रुपये मोजावे लागतील.
T20 विश्वचषक २०२४ मधील खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी संघ सुपर-८ मध्येही पोहोचू शकला नाही. आयसीसी स्पर्धेनंतर पाकिस्तान संघ पहिली मोठी मालिका खेळणार आहे. दरम्यान, बांगलादेशचा संघ त्यांच्या देशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे नियोजित वेळापत्रकाच्या आधी पाकिस्तानात येणार आहे. बांगलादेश संघाचे खेळाडू १३ ऑगस्टला लाहोरमध्ये उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.