महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये शुक्रवारी (२३ ऑगस्ट) हुबळी टायगर्स विरुद्ध बेंगळुरू ब्लास्टर्स सामना झाला. हा सामना खूपच थरारक झाला, कारण या सामन्यात एक, दोन नव्हे तर ३ सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या.
क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. मनीष पांडेच्या नेतृत्वाखाली हुबळी टायगर्सने प्रथम खेळताना स्कोअरबोर्डवर १६४ धावा केल्या होत्या.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरू ब्लास्टर्स आले तेव्हा त्यांनाही निर्धारित २० षटकांत १६४ धावाच करता आल्या.
बेंगळुरूकडून कर्णधार मयंक अग्रवालने ५४ धावांची खेळी खेळली. मात्र यानंतर दोनदा सुपर ओव्हर टाय झाली आणि अखेर तिसऱ्या सुपर ओव्हरनंतर सामन्याचा निकाल लागला.
या सामन्यात हुबळी टायगर्सने बेंगळुरू ब्लास्टर्ससमोर १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, मात्र ३ फलंदाजांनी ३० हून अधिक धावा केल्या. कर्णधार मनीष पांडेने ३३ धावांचे, मोहम्मद ताहाने ३१ धावांचे आणि अनिश्वर गौतमने ३० धावांचे योगदान दिले.
बेंगळुरूकडून गोलंदाजी करताना लविश कौशलने ४ षटकात केवळ १७ धावा देत ५ बळी घेतले.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघासाठी कर्णधार मयंक अग्रवालने ३४ चेंडूत ५४ धावांची खेळी खेळली, पण त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी खेळता आली नाही. शेवटच्या षटकांमध्ये सूरज आहुजाने २६ चेंडूत तर नवीनने ११ चेंडूत २३ धावांची खेळी खेळली. मात्र हे सर्व प्रयत्न बेंगळुरूला विजय मिळवून देऊ शकले नाहीत आणि सामना बरोबरीत संपला.
जेव्हा बेंगळुरू ब्लास्टर्स पहिल्या सुपर ओव्हरमध्ये खेळायला आले तेव्हा पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवाल बाद झाला. पहिल्या ५ चेंडूत फक्त ४ धावा झाल्या, पण अनिरुद्ध जोशीने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाची धावसंख्या १० धावांपर्यंत नेली.
या ११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हुबळी टायगर्सने पहिल्या ४ चेंडूत ९ धावा केल्या होत्या, मात्र लविश कौशलने शेवटच्या २ चेंडूत केवळ १ धाव दिली. यामुळे पहिली सुपर ओव्हर टाय झाली.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना एकही चौकार न मारता ८ धावा केल्या. पण बेंगळुरू ब्लास्टर्सची सुपर ओव्हर खूपच रोमांचक ठरली. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एलआर चेतन धावबाद झाला. शेवटच्या ३ चेंडूत ३ धावा झाल्या, त्यामुळे दुसरी सुपर ओव्हरही टाय झाली.
तिसऱ्या सुपर ओव्हरच्या पहिल्या ५ चेंडूंमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सने केवळ ६ धावा केल्या होत्या, परंतु शुभांग हेगडेने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. १३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हुबळी टायगर्सने पहिल्या ५ चेंडूत ९ धावा केल्या होत्या. त्यानंतर मनवंत कुमारने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून हुबळी टायगर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला.