Three Fans Breach Security Touch Virat Kohli Feet : टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली सध्या दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे. दिल्ली आणि रेल्वे सामन्यात विराटला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली. कोहलीला पाहण्यासाठी हजारो चाहते अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचले आहेत. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (३१ जानेवारी) तीन चाहते सुरक्षेला चकमा देत मैदानात घुसल्याची घटना घडली.
चाहते मैदानात घुसल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकही त्यांच्या मागे गेले आणि त्यांना पकडून मैदानाबाहेर काढले. यावेळी हे चाहते मैदानात जाऊन कोहलीच्या पाया पडले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, सामन्याच्या पहिल्या दिवशीही एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांना भेदून मैदानात प्रवेश केला होता.
विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी विराट केवळ ६ धावा करून बाद झाला तेव्हा चाहत्यांनी खचाखच भरलेले मैदान काही मिनिटांतच रिकामे झाले. विराटला हिमांशू सांगवान याने क्लीन बोल्ड केले होते. विराटला बाद केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सांगवानला प्रचंड ट्रोलही केले.
दरम्यान, विराटची फलंदाजी पाहण्यासाठी सामन्याच्या पहिल्या दिवशी १५ हजारांहून अधिक चाहते अरुण जेटली स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कारण दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात रेल्वेचा पहिला डाव २४१ धावांवर आटोपला.
याला प्रत्युत्तर म्हणून दिल्ली फलंदाजीला आली तेव्हा विराट कोहली केवळ ६ धावा करून बाद झाला. असे असतानाही दिल्लीने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून कर्णधार आयुष बडोनीने ९९ धावा आणि सुमित माथूरने ८६ धावा करत दिल्लीला सामन्यात परत आणले.
संबंधित बातम्या