IND VS PAK pitch New York : टी-20 वर्ल्डकप २०२४ वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने खेळला जात आहे. स्पर्धेतील १६ सामने अमेरिकेच्या मैदानावर खेळले जाणार आहेत आणि अंतिम सामन्यासह इतर ३५ सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहेत.
पण या स्पर्धेतील सर्वात चर्चित भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. पण नासाऊ काउंटी स्टेडियमच्या खेळपट्टीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक दिग्गजांनी या पीचवर टीका केली आहे.
या खेळपट्टीवर क्रिकेट दिग्गज सातत्याने आपली मते मांडत आहेत. मात्र, सोमवारी (३ जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यात खेळपट्टीचा स्वभाव दिसून आला. वास्तविक, श्रीलंकेचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघर्ष करताना दिसले.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज १९.१ षटकांत अवघ्या ७७ धावांत सर्वबाद झाले. श्रीलंकेच्या ८ फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.
कागिसो रबाडा आणि ॲनरिक नॉर्खिया यांना मिळालेली घातक उसळी कोणत्याही फलंदाजीसाठी अडचणी निर्माण करू शकते.
आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याच मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ ९ जूनला आमनेसामने येतील. पण आज ज्या प्रकारे खेळपट्टी पाहायला मिळाली, ते दोन्ही संघांच्या फलंदाजांसाठी चांगले संकेत नाही. या खेळपट्टीवर फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, तर गोलंदाज मोठी खेळी करू शकतात.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आणि आयर्लंडचे संघ ५ जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तान आणि आयर्लंडशिवाय भारतीय संघ अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ आपले पहिले ३ सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.