Gautam Gambhir Statement on Team India Coach : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा उत्तराधिकारी कोण असेल याची घोषणा अद्याप झालेली नाही. पण टीम इंडियाचा नवा कोच असेल, याच्या चर्चा शिगेला पोहोचल्या आहेत.
माजी क्रिकेटर गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याच्या बातम्यांनीही जोर पकडला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांनंतर अखेर गंभीरने या विषयावर वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापेक्षा गौरवशाली काहीही असू शकत नाही, असे गंभीरने म्हटले आहे.
टी-20 वर्ल्ड कप २०२४ नंतर, राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपत आहे. नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ १ जुलै २०२४ पासून सुरू होईल आणि ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत चालेल.
गौतम गंभीरचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर आहे. रिपोर्टनुसार, गंभीर आणि बीसीसीआय यांच्यातील बोलणी पूर्ण झाली असून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. अशा परिस्थितीत आता खुद्द गौतम गंभीरने टीम इंडियाच्या कोचिंगवर मौन सोडले आहे.
अबुधाबी येथे एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला, की “मला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला नक्कीच आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा गौरवशाली काय असू शकते. या भूमिकेतून तुम्ही १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करू शकता”.
तसेच, या सर्वांनी प्रार्थना केली तर भारत नक्कीच विश्वविजेता होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निर्भयपणे खेळले पाहिजे.”
गौतम गंभीरने ३ डिसेंबर २०१८ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. याच्या पुढच्याच वर्षी त्याने राजकारणात प्रवेश केला. २०१९ ची लोकसभा निवडणूक पूर्व दिल्लीतून लढवली, ज्यामध्ये त्याने आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांचा ६ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
मात्र २ मार्च २०२४ रोजी त्याने राजकारणाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जर आपण गंभीरच्या कोचिंग अनुभवावर नजर टाकली तर, तो आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर होता आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली KKR ने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले.
संबंधित बातम्या