यावर्षी जूनमध्ये आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला जाणार आहे. तर टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्वाची आहे. या मालिकेतील बरेचसे खेळाडू टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतात.
तसेच, टी-20 वर्ल्डकपआधी म्हणजेच मार्चमध्ये आयपीएलदेखील होणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरदेखील टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाऊ शकतो.
सध्या टीम इंडियाचे जवळपास सर्वच फलंदाज फॉर्मात आहेत. पण विश्वचषकात या सर्व फलंदाजांना खेळवणे शक्य नाही. तसेच, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही टी-20 मध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे काही युवा खेळाडूंसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत विराट आणि रोहितमुळे काही युवा खेळाडूंचा पत्ता टी-20 वर्ल्डकपमधून कट होऊ शकतो. अशाच काही खेळाडूंबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.
ऋतुराज गायकवाड टी-20 मध्ये सलामीला खेळतो. त्याने गेल्या काही काळात अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत शतकही झळकावले होते. मात्र आता संघात रोहित आणि विराट असल्याने तो टी-20 विश्वचषक खेळू शकणार नाही. कारण ऋतुराज हा रोहित आणि विराटप्रमाणे सुरुवातीला सेट होण्यास वेळ घेतो. त्यामुळे अशा फलंदाजांना एकाच टीममध्ये खेळवणे शक्य नाही.
सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत शिवम दुबेने दाखवलेल्या फलंदाजीमुळे मधल्या फळीत तिलक वर्माच्या अडचणी वाढवल्या आहेत. कारण सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या मधल्या फळीत फलंदाजी करतात. अशा स्थितीत तिलक वर्मा वर्ल्डकपमधून बाहेर राहणार हे जवळपास निश्चित आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला टी-20 मध्ये अद्यापही छाप सोडता आलेली नाही. त्याच्या नावावर नक्कीच एक शतक आहे पण त्यात सातत्याचा अभाव आहे. सोबतच तो डावाच्या सुरुवातीला वेगाने धावा करत नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
केएल गेल्या T20 विश्वचषकापासून म्हणजेच २०२२ टी-20 वर्ल्डकपपासून तो टी-20 संघातून बाहेर आहे. टॉप ऑर्डर युवा फलंदाजांनी भरलेली आहे. विराट आणि रोहित परतले आहेत. अशा परिस्थितीत राहुलला संघात जागा मिळेल असे वाटत नाही. यष्टिरक्षक म्हणून पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर भारताकडे अनेक पर्याय आहेत.
इशान किशन हा यष्टिरक्षक असून वरच्या फळीत फलंदाजी करतो. त्यामुळे त्यालाही वर्ल्डकपमध्ये संधी मिळणे जवळपास अशक्य आहे. याच कारणामुळे टीम इंडिया जितेश शर्माला सतत संधी देत आहे. तो फिनिशर आहे. दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेतही ईशान बेंचवरच होता.