बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले. यात तेजस्वी यादव म्हणाले की, टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली त्यांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली.
यानंतर आता क्रिकेट चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, की या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? विराट कोहली खरोखरच तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे का?
अशा स्थितीत आपण आज तेजस्वी यादव यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत. तसेच तेजस्वी यादव यांनी आयपीएलमधून किती कमाई केली आणि ते कोणत्या संघांसाठी खेळले हे देखील जाणून घेणार आहोत.
आयपीएल २००८ मध्ये, दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आता दिल्ली कॅपिटल्स) तेजस्वी यादव यांना ८ लाख रुपयांना विकत घेतले. यानंतर आयपीएल २००९ मध्येही तेजस्वी यादव यांची किंमत ८ लाख रुपये राहिली.
यानंतर ते आयपीएल २०१० मध्ये सहभागी झाले नाहीत. मात्र आयपीएल २०११ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने पुन्हा तेजस्वी यादव यांच्यावर बोली लावली. यावेळी त्यांना १० लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले.
तेजस्वी यादव यांचा आयपीएल प्रवास इथेच थांबला नाही, दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएल २०१२ सीझनसाठीही तेजस्वी यादव यांच्यासोबत १० लाख रुपयांचा करार केला. अशाप्रकारे तेजस्वी यादव यांनी आयपीएलमधून ३६ लाख रुपये कमावले.
यातील खास गोष्ट म्हणजे, तेजस्वी यादव यांनी कधीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. ते दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) संघासोबत ४ सीझन होते. पण त्यांना एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
अशाप्रकारे तेजस्वी यादव यांनी बॅट न धरता आयपीएलमधून ३६ लाख रुपये कमावले. तथापि, तेजस्वी यादव यांनी त्यांच्या कारकिर्दीत १ प्रथम श्रेणी सामना २ लिस्ट-ए आणि ४ टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली.
तेजस्वी यादव यांनी प्रथम श्रेणी सामन्यात १० च्या सरासरीने २० धावा केल्या. तर लिस्ट-ए सामन्यात त्यांनी ७ च्या सरासरीने १४ धावा केल्या, ज्यामध्ये सर्वोत्तम धावसंख्या ७ धावा होती. त्याच वेळी, तेजस्वी यादव यांनी ४ टी-20 सामन्यांच्या १ डावात ३ धावा केल्या.