Anil Kumble Record: भारतीय क्रिकेट संघात आतापर्यंत अनेक फिरकी गोलंदाज आले. परंतु, आजपर्यंत कोणीही अनिल कुंबळेंसारखा चमत्कार करू शकलेला नाही. भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेने आजच्या दिवशी २५ वर्षांपूर्वी कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट घेण्याचा पराक्रम केला. अनिल कुंबळेंचा हा विक्रम पाकिस्तान संघाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दिल्ली येथे ७ फेब्रुवारी १९९९ खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेंनी एका डावात १० विकेट घेतले. संपूर्ण पाकिस्तान संघाला एकहाती पॅव्हेलियनमध्ये पाठवून कुंबळेने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले. अनिल कुंबळेनंतर भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही.
दरम्यान, १९९९ मध्ये पाकिस्तानचा संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळला गेला. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत मालिकेत बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला दिल्ली कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता.
दिल्ली कसोटी सामन्यात भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीसमोर भारतीय संघाचा डाव २५२ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला अवघ्या १७२ धावांत गुंडाळले. अशा प्रकारे टीम इंडियाने पहिल्या डावात चांगली आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने ३३९ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ४२० धावांचे मोठे लक्ष्य गाठायचे होते.
भारताने दिलेल्या ४२० धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना पाकिस्तानने एकही विकेट न गमावता १०० धावांचा टप्पा पार केला. पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकेल, असे अनेकांना वाटू लागले. मात्र, त्यानंतर अनिल कुंबळे नावाच्या वादळाने पाकिस्तानच्या संघाला गुडघे टेकायला लावण्यास मजबूर केले. या सामन्यात पाकिस्तानची पहिली विकेट १०१ धावांवर पडली. त्यानंतर पाकिस्तानचा संपूर्ण संघ २०७ धावांवर सर्व बाद झाला. भारताने हा सामना २१२ धावांनी जिंकला. या सामन्यात अनिल कुंबळेने २६.३ षटकात ७४ धावा देत १० विकेट घेतले. इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकरनंतर अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला.