Indian Cricket Team Matches On Independence Day : भारताचा ७६ वा स्वातंत्रदिन आज संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत पराभव झाल्यानंतर आता अनेक खेळाडू भारतात परतले आहे. याशिवाय आयरिश संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघातील निवेदित खेळाडू आयर्लंडसाठी रवाना झाले आहे. परंतु स्वातंत्र्यदिनी भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास कसा राहिला आहे, हे तुम्हाला माहितीय का?, चला तर जाणून घेऊयात.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाने आतापर्यंत वनडे किंवा टी-२० सामना खेळलेला नाही. टीम इंडियाने स्वातंत्र्यदिनी केवळ सहा कसोटी सामने खेळलेले आहे. त्यात सहापैकी केवळ एका सामन्यात भारताचा विजय झालेला आहे. तर तब्बल चार सामन्यांत भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिलेला आहे. स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाने पहिला सामना १५ ऑगस्ट १९३६ साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्या इंग्लिश संघाने तब्बल नऊ गड्यांनी भारताचा पराभव केला होता. त्यानंतर १९५२ साली दोन्ही संघांमध्ये स्वातंत्र्यदिनी सामना झाला, ओव्हलवर झालेला हा चुरशीचा सामना अनिर्णित राहिला होता. १५ ऑगस्ट २००१ साली भारत आणि श्रीलंकेत कसोटी सामना झाला होता. त्यात श्रीलंकेने १० गड्यांनी विजय मिळवत टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता.
२०१४ साली स्वातंत्र्यदिनी पुन्हा भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना झाला. त्यात इंग्लंडने एक डाव आणि २४४ धावांनी भारताचा पराभव केला. पुढच्याच वर्षी २०१५ साली स्वातंत्र्यदिनी श्रीलंकेने भारतीय संघाला ६३ धावांनी धूळ चारली होती. परंतु २०२१ साली स्वातंत्र्यदिनी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघाने ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत करत इतिहास रचला होता. त्यामुळं स्वातंत्र्यदिनी झालेले कसोटी सामने भारतीय संघासाठी आतापर्यंत लकी राहिलेले नाहीत. तब्बल सहा सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवता आलेला आहे.