BCCI: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये टीम इंडियाचा ३-१ असा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय ११ जानेवारी रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची चौकशी करण्यात आली. ज्या खेळाडूची कामगिरीही चांगली आहे, त्याच खेळाडूला व्हेरिएबल पे देण्यात यावा, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या वर्षी टेस्ट क्रिकेट इन्सेन्टिव्ह स्कीम लागू केली होती.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, खेळाडूंनी अधिक जबाबदार व्हावे आणि गरज पडल्यास त्यांच्या कामगिरीच्या आधारे वेतन कपात केली जावी, हा या निर्णयामागचा हेतू आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची व्यवस्था राबविली जाते. हीच पद्धत बीसीसीआयही अवलंबू शकते. सुचवलेल्या या नव्या प्रणालीनुसार जर एखाद्या खेळाडूची कामगिरी चांगली नसेल तर त्याचा परिणाम खेळाडूच्या कमाईवर होईल.
खेळाडूंना जबाबदार धरण्यात यावे आणि त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्यांच्या वेतनात कपात करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली होती. गेल्या वर्षी बीसीसीआयने आपल्या कसोटी संघातील खेळाडूंसाठी टेस्ट क्रिकेट इन्सेंटिव स्कीम सुरू केली होती. यानुसार २०२२-२३ पासून एका मोसमात ५० टक्क्यांहून अधिक कसोटी सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट झालेल्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यामागे ३० लाख रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे.
एका मोसमात कमीत कमी ७५ टक्के किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे मानधन प्रति मॅच ४५ लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटसाठी बोर्डाने जाहीर केलेल्या ४० कोटी रुपयांच्या निधीचा हा एक भाग होता आणि टी-२० फॉरमॅट आणि इंडियन प्रीमियर लीग खूप आकर्षक बनले असताना खेळाडूंना लाल चेंडूच्या क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत काही खेळाडू कसोटी क्रिकेटला कमी महत्त्व देत आहेत आणि त्यासाठी इरादा दाखवत नाहीत, असा ही मुद्दा होता. ते पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटला प्राधान्य देत आहेत. पुढच्या पिढीला कसोटी क्रिकेट आणि भारताच्या कसोटी कॅपचे महत्त्व कळावे, यासाठी बोर्डाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटते. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी गेले काही महिने वाईट गेले आहेत. ऑस्ट्रेलियातील १० वर्षांची कसोटी मालिका गमावण्याआधी भारताचा घरच्या मैदानावर १२ वर्षांचा विजयाचा सिलसिलाही न्यूझीलंडविरुद्ध तुटला होता.
संबंधित बातम्या