बीसीसीआयने आज सोमवारी (२४ जून) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे कर्णधारपद आहे. या दौऱ्यासाठी पहिल्यांदाच नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू प्रथमच भारतीय संघात सामील झाले आहेत. मात्र, यष्टीरक्षक संजू सॅमसनही या संघाचा भाग आहे.
बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या दौऱ्यात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नसतील.
आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. त्यात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात राजस्थान रॉयल्सचे ५ खेळाडू आहेत. यातील २ खेळाडूंना पहिल्यांदाच टीम इंडियाकडून बोलावणे आले आहे. यामध्ये रियान पराग, ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे.
तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनही झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या या संघात आहे. संजूसोबतच यशस्वी जैस्वाल आणि आवेश खान हेदेखील झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहेत.
या दौऱ्यातील ५ खेळाडूंची पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. यात अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रियान पराग यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात कर्णधार शुभमन गिलसह यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग आणि रियान पराग यांचा फलंदाजीत समावेश आहे.
संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी हे अष्टपैलू खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे यांना संधी मिळाली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान , खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.
संबंधित बातम्या