मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : कॅप्टन, ओपनर, विकेटकीपर… काहीच फिक्स नाही, टीम इंडिया वर्ल्डकप कसं जिंकणार? पाहा

T20 WC 2024 : कॅप्टन, ओपनर, विकेटकीपर… काहीच फिक्स नाही, टीम इंडिया वर्ल्डकप कसं जिंकणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 09:31 PM IST

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपआधी म्हणजेच मार्चमध्ये आयपीएलदेखील होणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरदेखील टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाऊ शकतो.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (ANI)

यावर्षी जूनमध्ये आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेला ५ महिन्यांहून कमी काळ शिल्लक आहे. तर टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्वाची आहे. या मालिकेतील बरेचसे खेळाडू टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतात.

तसेच, टी-20 वर्ल्डकपआधी म्हणजेच मार्चमध्ये आयपीएलदेखील होणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरदेखील टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाऊ शकतो.

टीम इंडियासमोर अनेक प्रश्न 

पण टीम इंडियासमोर अनेक प्रश्न उपस्थित आहेत. आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आणि विकेटकीपर कोण असेल? हेदेखील अद्याप स्पष्ट नाही. सोबतच, भारतीय संघाला त्यांची योग्य सलामीची जोडीदेखील अद्याप सापडलेली नाही. 

तर टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे १४ महिन्यानंतर टी-20 क्रिकेट खेळत आहेत. अशा परिस्थितीत आगामी आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी चांगली राहिली तरच त्यांना विश्वचषकात संधी मिळेल. नाही तर दोघांनाही वर्ल्डकपमधून बाहेर राहावे लागू शकते.

टी-20 वर्ल्डकपसाठी कॅप्टन कोण?

विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे. सूर्या आणि हार्दिक सध्या दुखापतींशी झुंजत असून ते कधीपर्यंत मैदानात परतील, हे कोणालाच माहीत नाही. अशा स्थितीत रोहित शर्माची कर्णधारपदाची दावेदारी भक्कम दिसते.

विकेटकीपर कोण असेल?

या सोबतच टी-20 विश्वचषकासाठी सर्वात मोठा प्रश्न विकेटकीपर फलंदाज कोण असेल? हादेखील आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या T20 मालिकेत जितेश शर्मा आणि इशान किशन यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात निवड करण्यात आली होती. त्यानंतर अफगाणिस्तान मालिकेत जितेशसोबत संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळाले.

जितेशने आत्तापर्यंत ९ टी-20 सामने खेळले आहेत, मात्र त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. जितेश १६.६६ च्या सरासरीने केवळ १०० धावा करू शकला आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आहे.

 ईशानने ३२ टी-20 सामन्यात २५.६७ च्या सरासरीने ७९६ धावा केल्या आहेत. तर संजू सॅमसनने २४ टी-20 सामने खेळून ३७४ धावा केल्या आहेत.

जितेश, इशान आणि संजू व्यतिरिक्त भारताकडे केएल राहुलचाही पर्याय आहे. मात्र, राहुलने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये खेळला होता. 

वर्ल्डकपला केवळ ५ महिने बाकी

केएल राहुल आयपीएलच्या माध्यमातून निवडकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. राहुलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून लॉटरी लागू शकते. 

वर्ल्डकप ५ महिन्यांवर आहे आणि ओपनिंग स्लॉट, मिडल ऑर्डर आणि बॉलिंग युनिटबाबत काहीही स्पष्ट नाही. रोहित शर्मासोबतच ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे युवा खेळाडू ओपनिंग स्लॉटच्या शर्यतीत आहेत. 

रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे मधल्या फळीसाठी आपला दावा सादर करत आहेत. गोलंदाजीत मुकेश कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल. एकूणच भारतीय संघाची सध्याची तयारी अपेक्षेप्रमाणे नाही असे म्हणता येईल.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi