भारतीय क्रिकेट संघाने दमदार खेळ दाखवत टी-20 विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. पुढील फेरीत भारताला अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना वेस्ट इंडिजच्या ब्रिजटाऊन येथे होणार आहे. या सामन्याच्या तयारीपूर्वी टीम इंडिया नव्या रंगात पाहायला मिळत आहे.
संघाने आपले सर्व T20 विश्वचषक सामने फक्त अमेरिकेत खेळले आहेत. आता हा संघ सुपर-८ सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला आला आहे. पुढील फेरीचे सामने येथे खेळवले जातील. सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील काही सदस्य मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
बीसीसीआयने आपल्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. यामध्ये विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, खलील अहमद, संजू सॅमसन यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय टीमच्या सपोर्ट स्टाफमधील काही लोकही आहेत.
यावेळी सर्वांनी बीच व्हॉलीबॉलचा आनंद लुटला आणि खूप मजा केली. बीसीसीआयने ५७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, या खेळाडूंनी बीचवर खूप मजा केली.
टीम इंडियाने T20 विश्वचषक २०२४ च्या साखळी टप्प्यात ३ सामने खेळले आणि तिन्ही जिंकले. या संघाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना यजमान अमेरिकेशी झाला. हा सामनाही संघाने जिंकला.
शेवटचा सामना कॅनडासोबत होता पण पावसामुळे हा सामना वाहून गेला आणि भारताला चौथा विजय नोंदवण्याची संधी मिळाली नाही. आता भारतीय संघासमोर २० जून रोजी अफगाणिस्तानचे आव्हान असणार आहे.
संबंधित बातम्या