IND vs AUS Adelaide Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताने पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. आता भारताचा दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हलवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. जो गुलाबी चेंडूने ६ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान खेळला जाईल.
भारतीय संघाने शेवटचा दिवस-रात्र कसोटी सामना २०२२ मध्ये खेळला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा पिंक बॉल टेस्टचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया.
पिंक बॉल कसोटी क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी मायदेशात उत्कृष्ट राहिली आहे, परंतु संघाला अद्याप परदेशी भूमीवर विजयाची चव चाखता आलेली नाही. भारताने आतापर्यंत गुलाबी चेंडूने एकूण ४ कसोटी खेळल्या आहेत, ज्यामध्ये तीन सामने मायदेशात आणि एक सामना परदेशात खेळला गेला.
या चार सामन्यांपैकी, भारताने तीन जिंकले आहेत, परंतु २०२० मध्ये ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव परदेशातील पिंक बॉल कसोटीत संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
ईडन गार्डन (२०१९)- बांगलादेशविरुद्ध एक डाव आणि ४६ धावांनी विजय
ॲडलेड ओव्हन (२०२१)-ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ गडी राखून पराभव
अहमदाबाद (२०२१) - इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी विजयी
बंगळुरू (२०२२) - श्रीलंकेविरुद्ध २३८ धावांनी विजय
भारताने २०२० मध्ये ॲडलेडच्या या मैदानावर पिंक बॉल टेस्ट खेळली होती, ज्यामध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजीचा क्रम पूर्णपणे गारद झाला आणि संघ अवघ्या ३६ धावांवर गडगडला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे, जी विसरणे कठीण आहे.
ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी जिंकणे भारतीय संघासाठी सोपे नसेल. ऑस्ट्रेलियन संघ घरच्या परिस्थितीत खूप मजबूत मानला जातो. पण पर्थमधील २९५ धावांच्या विजयाने भारत यावेळी इतिहास रचण्याच्या इराद्याने आल्याचे दाखवून दिले आहे.
पर्थ कसोटीतील मोठ्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे संघ अधिक मजबूत दिसत आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला ॲडलेडमध्ये विजयाची नोंद करून २०२० च्या पराभवाचा बदला तर घ्यायचा आहेच, तसेच, परदेशी भूमीवर पहिल्यांदा पिंक बॉल टेस्ट जिंकून इतिहास रचायचा आहे.