मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs SA Final : बुमराहने २ षटकात सामना फिरवला, सूर्यकुमारने कॅच नाही वर्ल्डकप पकडला, शेवटच्या १५ मिनिटांचा थरार, पाहा

IND Vs SA Final : बुमराहने २ षटकात सामना फिरवला, सूर्यकुमारने कॅच नाही वर्ल्डकप पकडला, शेवटच्या १५ मिनिटांचा थरार, पाहा

Jun 30, 2024 10:53 AM IST

दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने ७६ धावांची खेळी खेळली, त्यानंतर गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी करत आफ्रिकेला विजय मिळवण्यापासून रोखले.

IND Vs SA Final : बुमराहने २ षटकात सामना फिरवला, सूर्यकुमारने कॅच नाही वर्ल्डकप पकडला, शेवटच्या १५ मिनिटांचा थरार, पाहा
IND Vs SA Final : बुमराहने २ षटकात सामना फिरवला, सूर्यकुमारने कॅच नाही वर्ल्डकप पकडला, शेवटच्या १५ मिनिटांचा थरार, पाहा

भारताने टी-20 वर्ल्डकप २०२४ जिंकला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत १० वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. तर १७ वर्षांनंतर भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला.

आफ्रिकेला शेवटच्या ४ षटकात केवळ २६ धावांची गरज होती, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी करत संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला.

१७७ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचीही सुरुवात खराब झाली. पण त्यांच्या मधल्या फळीने शानदार फलंदाजी करत डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ३० चेंडूत ३० धावा करायच्या होत्या. भारतीय चाहत्यांनी हार मानली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

हेन्रिक क्लासेन ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून टीम इंडियाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. पण खरा थरार बाकी होता, जसप्रीत बुमराह १६ वी ओव्हर टाकायला आला, जसप्रीत बुमराह चाहत्यांची शेवटची आशा होता.

या षटकात दमदार फलंदाजी करणाऱ्या हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांना केवळ ४ धावा करता आल्या, मात्र असे असतानाही दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा विजय निश्चित दिसत होता आणि जसप्रीत बुमराहने त्याची ३ षटके पूर्ण टाकली होती.

१६ वे षटक

दक्षिण आफ्रिकेचा विजय जवळपास निश्चित झाला होता, भारतीय चाहत्यांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर खिळल्या होत्या... मात्र, जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही, पण अतिशय किफायतशीर षटक टाकले. या षटकात फक्त ४ धावा झाल्या आणि भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढू लागला, देहबोली बदलू लागली.

भारतीय खेळाडूंनी क्लासेनची लय तोडली

१७ वे षटक सुरू होण्याआधी टीम इंडियाने माइंड गेम खेळला.  वास्तविक, १७व्या षटकात भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला. हे षटक सुरू होण्याच्या आधी भारतीय खेळाडूंनी थोडासा वेळ घेतला आणि सामन्याची गती मंद केली. याचे नुकसान फलंदाज हेनरिक क्लासेनला झाले. त्याची लय तुटली आणि हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.

त्याआधी १५व्या षटकात क्सासेनने अक्षर पटेलच्या एका षटकात २४ धावा वसूल केल्या होत्या.

१७ वे षटक

हार्दिक पांड्या भारतासाठी १७ वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करणाऱ्या हेनरिक क्लासेनला बाद केले, पण तरीही सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातात होता, कारण डावीकडे दुसरा धोकादायक डेव्हिड मिलर भारताच्या विजयाच्या आड उभा होता. हार्दिक पांड्याने या षटकात केवळ ४ धावा दिल्या, यानंतर भारतीय चाहत्यांच्या आशा थोड्या प्रमाणात वाढू लागल्या.

१८ वे षटक

जसप्रीत बुमराह १८ वे ओव्हर टाकायला आला. भारतीय चाहत्यांमध्ये आता उत्साह भरला होता, जसप्रीत बुमराहनेही निराश केले नाही. या षटकात त्याने केवळ २ धावा दिल्या आणि मार्को यान्सेनची मौल्यवान विकेटही घेतली. आता भारत पूर्णपणे सामन्यात होता, पण डेव्हिड मिलर दुसऱ्या एंडवर उभा होता.

१९वे षटक

अर्शदीप सिंग १९ वे ओव्हर टाकायला आला. आता दक्षिण आफ्रिकेला १२ चेंडूत २० धावा हव्या होत्या, नजर डेव्हिड मिलरवर होती, डेव्हिड मिलर भारत आणि विजयाच्या मध्ये उभा होता. या षटकात डेव्हिड मिलर आणि केशव महाराज केवळ ४ धावा करू शकले, आता संपूर्ण स्टेडियम भारतीय चाहत्यांच्या आवाजाने दणाणून गेले होते, भारतीय खेळाडूंसह चाहत्यांचा आत्मविश्वास परतला होता.

२० वे षटक

चेंडू हार्दिक पांड्याच्या हातात तर स्ट्राइकवर जगातील सर्वोत्तम फिनीशर डेव्हिड मिलर होता. मिलरने षटकातील पहिल्याच मोठा फटका खेळला, भारतीय चाहत्यांचा श्वास रोखला गेला, पण सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. खरं तर सूर्यकुमारने झेल नाही तर वर्ल्डकपच पकडला. मिलर बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज केशव महाराज आणि कागिसो रबाडा शेवटच्या ५ चेंडूंवर ८ धावा जोडू शकले, त्यामुळे टीम इंडियाने ७ धावांनी विजय मिळवला.

भारताचा डाव

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला सामन्यात परत आणले. अक्षर पटेलने ३१ चेंडूत ४७ तर विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. शिवम दुबेने १६ चेंडूत २७ धावांची खेळी करत भारताला १७६ धावांपर्यंत मजल मारली.

WhatsApp channel