टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याच्यासोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर अपमानास्पद वागणूक झाल्याचे अभिषेकने स्वत: सोशल मीडियावर सांगितले आहे.
अभिषेक शर्माच्या म्हणण्यानुसार, ही घटना इंडिगो आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या वाईट वर्तुणूकीशी संबंधित आहे. त्याने याबाबत काउंटर मॅनेजरची तक्रार केली आहे. यापूर्वी कधीही इतका वाईट अनुभव आला नसल्याचे अभिषेकने सांगितले. त्याच्या मते, यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही.
अभिषेकने सांगितले की तो योग्य वेळी योग्य काउंटरवर पोहोचला होता. असे असतानाही त्याला काउंटर व्यवस्थापकाने विनाकारण दुसऱ्या काउंटरवर जाण्यास सांगितले. अभिषेकच्या म्हणण्यानुसार, या समस्येमुळे त्याची फ्लाइट मिस झाली. अभिषेकने विशेषत: काउंटर मॅनेजर सुष्मिता मित्तल यांचे नाव घेतले, असून त्यांचे वर्तन सहन करण्यापलीकडचे होते.
अभिषेकने पुढे सांगितले की, त्याच्याकडे फक्त एक दिवस सुट्टी होती. पण आता फ्लाईट चुकल्यामुळे ती वाया गेली आहे.
अभिषेक म्हणाला की, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे इंडिगोने त्यांना इतर कोणतीही मदत केली नाही. कोणत्याही एअरलाइन्समधील हा सर्वात वाईट अनुभव होता.
अभिषेक शर्माची नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो संजू सॅमसनसोबत भारतीय डावाची सुरुवात करताना दिसणार आहे.
अभिषेक शर्माचा सध्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावा केल्या आहेत. या दोन्ही देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धही अभिषेक शर्मा हाच फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या