BGT 3rd Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळं अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. यामुळं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भलताच खूष झाल आहे. हा सामना ड्रॉ होणं हा आमच्यासाठी मानसिक विजय असल्याचं रोहितनं म्हटलं आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत आमचा आत्मविश्वास दुणावलेला असेल, असं रोहित शर्मा यानं सांगितलं.
रोहित शर्मा यानं फॉलोऑन टाळण्यास मदत करणाऱ्या केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांचं तोंडभरून कौतुक केलं. तीन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आल्यानं रोहितनं आनंद व्यक्त केला.
सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण समारंभात रोहित शर्मा यानं या सगळ्यावर भाष्य केलं. 'हा निकाल आम्ही स्वीकारतोय. पावसामुळं सामनात अडथळ येणं हे चांगलं नव्हतं, पण १-१ अशी बरोबरी झाल्यानं आता आम्हाला आत्मविश्वासानं मैदानात उतरता येईल. दुपारच्या जेवणानंतर (चौथ्या दिवशी) सामन्यात आमची परिस्थिती बिकट होती. अशावेळी कोणीतरी तिथं उभं राहणं गरजेचं होतं. हवामानामुळं हा संपूर्ण सामना होणार नाही याची कल्पना आम्हाला आली होती. मात्र, तो निर्णय होईपर्यंत खिंड लढवणं गरजेचं होतं. जडेजा आणि राहुलला हे श्रेय जातं. आकाश दीप आणि बुमराहला लढताना पाहून खूप छान वाटलं. नेटमध्ये फलंदाजीवर मेहनत घेताना आम्ही त्यानं पाहिलंय, असं रोहित म्हणाला.
'गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराह उत्कृष्ट गोलंदाजी करत होता. आकाश दीप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप नवीन आहे, त्यानं नेटमध्ये कठोर मेहनत घेतली आहे. टीममध्ये असे अनेक सहकारी आहेत जे त्याला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. आकाश दीपनं पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली, पण त्याला एकच विकेट मिळाली. मात्र दुसऱ्या डावात त्यानं २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह अव्वल दर्जाचा होता. त्यानं पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या, असंही रोहित यानं सांगितलं.
संबंधित बातम्या