बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ धमाकेदार फलंदाजी केली आहे. कोणताही फलंदाज क्रीझवर आला की तो चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
वास्तविक, टीम इंडियाने २०२४ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. टीम इंडिया कसोटीत सर्वात जास्त षटकार ठोकणारा संघ बनला आहे.
विशेष म्हणजे, बॅझबॉल क्रिकेटचा गवगवा करणारा इंग्लंडचा संघ टीम इंडियाच्या जवळपासही नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंनी २०२४ मध्ये आतापर्यंत ९० हून अधिक षटकार मारले आहेत आणि ही संख्या आणखी वाढणार आहे.
यापूर्वी एका वर्षात कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. २०२२ मध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी मिळून एकूण ८९ षटकार मारण्याचा विक्रम केला होता. पण आता भारतीय संघाने ९० षटकारांचा आकडा पार करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विशेष म्हणजे, भारतीय खेळाडूंनी अवघ्या १४ डावात हा विक्रम केला आहे. ही खूप मोठी आणि अविश्वसनीय बाब आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे लांब षटकार मारण्याच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेत आहेत.इंग्लंडच्या एक वर्ष आधी, २०२१ मध्ये भारताने ८७ षटकार मारले होते.
इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर 'बॅझबॉल' स्टाईलमुळे इंग्लिश संघातील खेळाडू वेगवान फलंदाजी करतात. पण खरे 'बॅझबॉल' क्रिकेट कोण खेळतो हे भारताने दाखवून दिले आहे.
२०२४ मध्ये भारताने ९० हून अधिक षटकार मारून ऐतिहासिक विक्रम केला आहे. चालू वर्षाबद्दल बोलायचे झाले तर या यादीत इंग्लंड ६० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंड ५१ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताला या वर्षात अजून ८ कसोटी सामने खेळायचे असल्याने वर्षभरात जास्तीत जास्त षटकारांची संख्या १०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
भारत - ९२ षटकार
इंग्लंड - ६० षटकार
न्यूझीलंड - ५१ षटकार