वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून टी-20 विश्वचषकाचा महाकुंभ सुरू होत आहे. या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले आहेत. तिथे पोहोचल्यानंतर टीम इंडियाने नेट सरावही सुरू केला आहे.
पण संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा न्यूयॉर्कमध्ये सुविधांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. आयसीसीने दिलेल्या सुविधांबाबत अनेक खेळाडू समाधानी नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला नासाऊ काउंटीमधील गार्डन सिटी व्हिलेजमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून कँटिग पार्कमध्ये सरावाची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधा मध्यम दर्जाच्या असून त्या कायमस्वरूपी तयार करण्यात आल्या नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. तसेच या ठिकाणी जेवणाच्या व्यवस्थेवरही खेळाडू नाराज आहेत.
याशिवाय, न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सरावाची सोय नाही, जिथे संघाला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे कारण १ जून रोजी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यापर्यंत त्यांना कॅन्टीग्यू पार्कमध्ये सराव करावा लागणार आहे. ग्रुप सामने खेळल्यानंतर संघ फ्लोरिडाला जाईल आणि त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये सुपर ८ सामने खेळेल. दरम्यान, टीम इंडियाच्या नाराजीवर आयसीसीने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० विश्वचषकात पहिला सामना खेळणार आहे. यानंतर ९ जूनला भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. १२ जूनला भारताचा सामना अमेरिकेशी होणार असून शेवटचा साखळी सामना १५ जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.
टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान
संबंधित बातम्या