मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : अफगाणिस्तान मालिकेमुळे रोहित-द्रविडचं टेन्शन वाढलं, टीम इंडियासमोर आता हे तीन मोठे प्रश्न, पाहा

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तान मालिकेमुळे रोहित-द्रविडचं टेन्शन वाढलं, टीम इंडियासमोर आता हे तीन मोठे प्रश्न, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 20, 2024 10:54 PM IST

T20 World Cup 2024 Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासाठी सर्वकाही ठीक दिसत होते, परंतु टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून अनेक मोठे प्रश्न अजूनही कायम आहेत. या प्रश्नांची उत्तरे कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला लवकरच शोधावी लागतील.

T20 World Cup 2024 Team India
T20 World Cup 2024 Team India (PTI)

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकली. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्डकपआधी भारताची ही शेवटची मालिका होती. यानंतर भारत आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल होईल. 

अशा स्थितीत अफगाणिस्तान मालिका आणि आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार मारले, तर गोलंदाजीत युवा गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. 

या मालिकेत टीम इंडियासाठी सर्वकाही ठीक दिसत होते, परंतु टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून अनेक मोठे प्रश्न अजूनही कायम आहेत. या प्रश्नांची उत्तरे कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला लवकरच शोधावी लागतील. 

विराट कोहली १४ महिन्यांनंतर टी-20 संघात परतला आहे. वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आणि कोहलीने १८१ च्या स्ट्राईक रेटने १६ चेंडूत २९ धावा केल्या. 

कोहली टी-20 च्या बॅटिंग लाइनअपमध्ये बसू शकेल का?

पण तिसऱ्या टी-20 मध्ये विराट गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अलीकडच्या काळात, भारतीय संघाने विशेषतः टी-20 क्रिकेटमध्ये आक्रमक स्टाईलने खेळायचे ठरवले आहे. यामुळे सर्व फलंदाजांच्या स्ट्राइक रेटवर मॅनेजमेंट लक्ष ठेवून आहे.

आता प्रश्न असा पडतो की विराट या आक्रमक पद्धतीच्या बॅटिंग लाइनअपमध्ये बसू शकेल का? अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीत कोहली काही विशेष करू शकला नाही आणि आता या फॉरमॅटमध्ये तो कशी फलंदाजी करतो, हे पाहण्याची संधी फक्त आयपीएलमध्येच मिळणार आहे.

बॉलिंग कॉम्बिनेशन काय असेल?

२०२४ च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाचे बॉलिंग कॉम्बिनेशन काय असेल हा दुसरा मोठा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज संघात परतणार आहेत. अशा परिस्थितीत अर्शदीप आणि मुकेश कुमार यांना पुन्हा जागा मिळेल का? हार्दिक पांड्याचेही अद्याप संघात पुनरागमन झालेले नाही.

केवळ वेगवान आक्रमणच नाही, तर फिरकी विभागात बॉलिंग कॉम्बिनेशन काय असेल, हा मोठा प्रश्न आहे. कुलदीप यादवसोबत रवी बिश्नोई संघात कसा फिट बसेल? चेंडूने सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलला कर्णधार रोहित संघात कसा बसवणार? रवींद्र जडेजाही फिरकी अष्टपैलू म्हणून संघात सामील होणार आहे. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरही वर्ल्डकपच्या शर्यतीत आहे.

१५ खेळाडूंची निवड कशी करणार?

निवड समितीने गेल्या काही टी-20 मालिकांमध्ये सातत्याने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. प्रत्येक मालिकेत काही खेळाडूंनी आपल्या खेळाने खूप प्रभावित केले आहे. रिंकू सिंगची फलंदाजी अव्वल दर्जाची राहिली आहे, तर मुकेश कुमारने गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 

रवी बिश्नोईनेही चांगलेच प्रभावित केले आहे. केएल राहुल, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची नावे यष्टिरक्षक म्हणून पुढे आली आहेत. पण इशान किशनलाही विसरता येणार नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यां दोघांना टॉप ऑर्डरमध्ये बसवणे खूप अवघड काम झाले आहे. ऋतुराज गायकवाडनेही गेल्या काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित आणि निवड समिती सर्व इनफॉर्म खेळाडूंना संघात कसे फिट करतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi