BGT : वेळ न पाळल्यानं रोहित शर्मा भडकला, यशस्वी जयस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम इंडियाची बस
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BGT : वेळ न पाळल्यानं रोहित शर्मा भडकला, यशस्वी जयस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम इंडियाची बस

BGT : वेळ न पाळल्यानं रोहित शर्मा भडकला, यशस्वी जयस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम इंडियाची बस

Dec 11, 2024 02:13 PM IST

Yashasvi Jaiswal News : वेळ न पाळणाऱ्या यशस्वी जयस्वालला रोहित शर्मा यानं चांगलाच धडा दिला. त्याला हॉटेलवरच सोडून टीम इंडियाची बस रोहितच्या सांगण्यावरून विमानतळाकडं रवाना करण्यात आली.

यशस्वी जायसवाल
यशस्वी जायसवाल (AFP)

Border Gavaskar Trophy News : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चुरशीची कसोटी मालिका सुरू आहे. बॉर्डर-गावस्कर करंडकाचे दोन सामने खेळले गेले असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. टीम इंडिया अ‍ॅडलेडमध्ये एक दिवस जास्त घालवून ब्रिस्बेनला रवाना झाली, पण ब्रिस्बेनला रवाना होण्यापूर्वी एक विचित्र घटना पाहायला मिळाली. रोहित शर्माच्या सांगण्यावरून संघाची बस सलामीवीर यशस्वी जयस्वालला हॉटेलमध्येच सोडून निघून गेली. बस पकडायला त्यानं उशीर केल्यामुळं हा प्रकार घडला.

बुधवारी ११ डिसेंबरला टीम इंडिया पहाटे अ‍ॅडलेडमधील आपल्या हॉटेलमधून निघाली आणि ब्रिस्बेनला विमानानं रवाना झाली. बॉर्डर-गावस्कर करंडक (BGT 2024-25) ची तिसरी कसोटी शनिवार १४ डिसेंबरपासून रिव्हर सिटीच्या प्रतिष्ठित गाबा मैदानावर खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंना विमानतळावर घेऊन जाणारी बस यशस्वी जयस्वालशिवाय निघाली. हा सगळा प्रकार कर्णधार रोहित शर्माच्या सांगण्यावरून घडला, कारण यशस्वीला टीम हॉटेलमधून बाहेर यायला उशीर झाला होता.

क्रिकट्रॅकरच्या रिपोर्टनुसार, कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जयस्वालच्या वागण्यावर नाराज असल्याचं दिसत होतं. ब्रिस्बेनला सकाळी १०.०५ वाजता संघाचं उड्डाण होणार असल्यानं ही बस स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता विमानतळाच्या दिशेनं जाणं अपेक्षित होतं. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बसमध्ये चढू लागले. मात्र, यशस्वी जयस्वाल कुठंही दिसला नाही. बस गेटजवळ काही मिनिटे थांबल्यानंतर रोहित शर्मा खाली उतरला आणि त्यानं टीम मॅनेजर आणि संपर्क अधिकाऱ्याशी चर्चा केली.

थोड्या वेळानंतर कर्णधार रोहित शर्मा पुन्हा बसमध्ये चढला. रोहितच्या सांगण्यावरून ड्रायव्हर यशस्वी शिवाय सकाळी ८.५० च्या सुमारास बस विमानतळाकडं निघाला. बस सुटल्यानंतर सुमारे पाच मिनिटांनी डावखुरा फलंदाज हॉटेलमधून बाहेर पडला. मात्र, लवकरच यशस्वी संघाच्या सुरक्षा अधिकाऱ्यासोबत कारनं विमानतळावर पोहोचला आणि भारतीय संघासह ब्रिस्बेनला रवाना झाला. मात्र, या प्रसंगामुळं उलटसुलट चर्चा रंगली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या