Tamim Iqbal Heart attack : बांगलादेशचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू तमिम इक्बाल याला हृदयविकाराचा झटका आला आहे. विशेष म्हणजे, सामना खेळत असताना तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बाल ढाका प्रीमियर लीग (DPL) मध्ये मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. क्षेत्ररक्षण करताना तमिम इक्बालच्या छातीत दुखू लागले.
ढाका प्रीमियर लीगमध्ये आज (२३ मार्च) मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाइनपुकुर क्रिकेट क्लबचे संघ आमनेसामने होते. यादरम्यान तमिम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बालला फिल्डिंग करताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला फजिलातुनेशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तमिम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे फिजिशियन डॉ. देबाशिष चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
तमीम इक्बालने छातीत दुखत असल्याची तक्रार करताच त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, तमिमने ही तक्रार ५० षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात केली होती, त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ तातडीने पोहोचले.
७० कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, तमिम इक्बालने २४३ एकदिवसीय आणि ७८ टी-20 सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. टेस्ट फॉरमॅटमध्ये तमिम इक्बालने ३८.८९ च्या सरासरीने ५१३४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ३६.६५ च्या सरासरीने ८३५७ धावा केल्या.
तसेच बांगलादेशसाठी टी-20 फॉरमॅटमध्ये ११७.२० च्या स्ट्राईक रेटने आणि २४.०८ च्या सरासरीने १७५८ धावा केल्या. तमिम इक्बालने एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतके झळकावली आहेत. याशिवाय तमिम इक्बालच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये १४ शतके आहेत. तर या फलंदाजाने टी-20 फॉरमॅटमध्ये एकदाच शतकाचा टप्पा ओलांडला आहे.
संबंधित बातम्या