भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाने ४-१ असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, याच मालिकेत टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला.
अश्विनने या मालिकेतून करिअरचे १०० कसोटी सामने आणि ५०० कसोटी बळी पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट घेणारा अश्विन हा जगातील नववा गोलंदाज ठरला आहे. तर कसोटीत ५०० बळींचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने ५ सामन्यात २६ विकेट घेतल्या .
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण केल्यामुळे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अश्विनचा गौरव केला आहे. यावेळी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अश्विनला १ कोटी रुपयांचा धनादेश तसेच, अनेक भेटवस्तू दिल्या.
अश्विनला ५०० विकेट्स पूर्ण केल्याबद्दल ५०० सोन्याची नाणी, एक चांदीची ट्रॉफी, एक विशेष ब्लेझर देण्यात आला. या सन्मान सोहळ्यात रवीचंद्रन अश्विनची पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुली उपस्थित होत्या.
याच सोहळ्यात आर अश्विनने महेंद्रसिंह धोनीचे मनापासून आभार मानले आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धोनीबाबत बोलताना अश्विन म्हणाला की, "मला माझ्या मनापासून एमएस धोनीचे आभार मानायचे आहेत. त्याने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याचा नेहमीच ऋणी राहीन. त्याने मला खूप काही दिले आहे. त्याने मला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली."
अश्विनच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ६ नोव्हेंबर २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने झाली होती. यानंतर काही दिवसांनी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर अश्विन इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज म्हणून उदयास आला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १०० सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ५१६ विकेट्स आहेत. याशिवाय त्याने ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५६ विकेट्स आणि ६५ टी-20 सामन्यात ७२ विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या