Ravindra Jadeja Retires: रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानेही आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रवींद्र जाडेजाची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाडेच्या निवृत्तीवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मोदींनी रवींद्र जडेजाचे खूप कौतुक केले आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रिय रवींद्र जडेजा, तू अष्टपैलू म्हणून शानदार खेळ दाखवला. तुझ्या गोलंदाजीचे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद, तुला भविष्यासाठी शुभेच्छा.”
रवींद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून निवृत्तीची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, "मनापासून आभार, मी टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा करत आहे. अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे मी माझ्या देशासाठी नेहमीच १०० टक्के दिले आणि देत राहीन. टी-२० विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरले. आठवणी, उत्साह आणि अतूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद."
जाडेजाने ७४ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना ४१ डावात ५१५ धावा केल्या. त्यापैकी १७ डावात तो नाबाद राहिला. या अष्टपैलू खेळाडूने लोअर-मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी केली. गोलंदाजीच्या जोरावर जाडेजाने मजबूत इकॉनॉमी रेट कायम राखत आपल्या टी-२० कारकिर्दीचा शेवट ७.१३ च्या सरासरीने केला. त्याने सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये ५४ विकेट्स घेतल्या. रवींद्र जाडेजाने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जाडेजाशिवाय टी-२० क्रिकेट खेळावे लागणार आहे.
जाडेजा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करत राहील. भारतीय संघातील मोजक्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या जाडेजाला दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाच्या २०२२ च्या आवृत्तीला मुकावे लागले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो टी-२० क्रिकेटमध्ये परतला.
संबंधित बातम्या