विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेला भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मनमोकळेपणाने चर्चा केली. त्याच्या मूळ गावी कानपूरला पोहोचलेल्या कुलदीप यादवच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. कुलदीपच्या सन्मानार्थ चाहत्यांनी फटाके, ढोल-ताशे आणि संगीताची व्यवस्था केली होती.
मीडियाशी संवाद साधताना 'चायनामन'ने त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितले. यावेळी बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
कुलदीपने सांगितले की, 'तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल, पण माझी जीवनसाथी कुठलीही अभिनेत्री होणार नाही. ती माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते हे महत्त्वाचे आहे. टी-२० विश्वचषक विजयाबद्दल कुलदीप यादव म्हणाला, 'आम्ही खूप आनंदी आहोत. याची आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो. आपल्या लोकांना इथे पाहून खूप छान वाटतं. विश्वचषक आणल्याने खूप आनंद होत आहे. हे आपल्यापेक्षा भारतासाठी अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आनंद झाला".
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर खेळाडू मुंबईला रवाना झाले. मुंबईतील मेन इन ब्लूने मरीन ड्राईव्ह ते आयकॉनिक वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बस विजय परेड काढली. उत्साही चाहत्यांच्या जयजयकार, जल्लोष आणि टाळ्यांच्या गजरात, संघ वानखेडे स्टेडियमवर गेला, जिथे त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली. खचाखच भरलेल्या मैदानात, खेळाडूंनी त्यांच्या विजयाबद्दल आणि टी-20 विश्वचषकातील प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीबद्दलही सांगितले आणि जोरदार डान्स केला.
कुलदीप यादवला स्पर्धेच्या साखळी फेरीत प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, परंतु तो सुपर-८ फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सतत संघाचा भाग राहिला, यादरम्यान त्याने ५ सामन्यांत १० बळी घेतले.
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ बार्बाडोसमध्ये बेरील चक्रीवादळात अडकला. विमानतळ बंद करण्यात आले, त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विशेष चार्टरची व्यवस्था केली आणि भारतीय संघ ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीला रवाना झाला. या फ्लाइटमध्ये क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बोर्डाचे अधिकारी, सपोर्ट स्टाफ आणि काही भारतीय पत्रकारही उपस्थित होते.