WI vs Uganda : युगांडाने टी-20 विश्वचषकातील सर्वात लहान धावसंख्या केली, वेस्ट इंडिजने १३४ धावांनी सामना जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs Uganda : युगांडाने टी-20 विश्वचषकातील सर्वात लहान धावसंख्या केली, वेस्ट इंडिजने १३४ धावांनी सामना जिंकला

WI vs Uganda : युगांडाने टी-20 विश्वचषकातील सर्वात लहान धावसंख्या केली, वेस्ट इंडिजने १३४ धावांनी सामना जिंकला

Jun 09, 2024 11:44 AM IST

west indies vs uganda highlights : टी-20 विश्वचषक २०२४ च्या १८ व्या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाचा १३४ धावांनी पराभव केला. टी-20 विश्वचषकातील ही सर्वात लहान धावसंख्या ठरली.

WI vs Uganda : युगांडाने टी-20 विश्वचषकातील सर्वात लहान धावसंख्या केली, वेस्ट इंडिजने १३४ धावांनी सामना जिंकला
WI vs Uganda : युगांडाने टी-20 विश्वचषकातील सर्वात लहान धावसंख्या केली, वेस्ट इंडिजने १३४ धावांनी सामना जिंकला (AP)

west indies vs uganda t20 world cup 2024 highlights : टी-20 विश्वचषक २०२४ चा १८ वा सामना (९ जून) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि युगांडाचा संघ १२ षटकात ३९ धावांत सर्वबाद झाला. टी-20 विश्वचषकातील ही संयुक्तपणे सर्वात लहान धावसंख्या आहे.

फिरकीपटू अकिल हुसेनने सर्वाधिक ५ बळी घेत युगांडाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. युगांडाने हा सामना १३४ धावांनी हरला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकात ५ बाद १७३ धावा केल्या. जॉन्सन चार्ल्सने ४२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा करत संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली.

अखेरीस आंद्रे रसेल आणि रोमारियो शेफर्ड संघासाठी नाबाद राहिले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३३* (१६ चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान, रसेलने १७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा केल्या आणि शेफर्डने ५ चेंडूत ५* धावा केल्या.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. वेस्ट इंडिजचा हा दुसरा विजय ठरला. या संघाने पापुआ न्यू गिनीविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता. तर युगांडाविरुद्ध वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखले आणि मोठा विजय नोंदवला.

याआधी २०१४ मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात नेदरलँडचा संघ श्रीलंकेविरुद्ध ३९ धावांत गारद झाला होता.

युगांडाचा डाव

१७४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाची पहिली विकेट पहिल्याच षटकात पडली, अकील हुसेनने रॉजर मुकासाला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सायमन सेसाझीच्या (४) रूपाने संघाची दुसरी विकेट पडली. यानंतर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अल्पेश रामजानी (५) तिसरी विकेट म्हणून बाद झाला आणि त्यानंतर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन ओबुया (६) च्या रूपाने युगांडाला चौथा धक्का बसला.

यानंतर संघाने १९ धावांवर रियाजत अली शाहच्या रूपात पाचवी विकेट गमावली, जो ५ व्या षटकात अकील हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

संघाच्या विकेट पडण्याची प्रक्रिया अशीच सुरू राहिली आणि ७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या दिनेश नाक्राणीच्या (००) रूपाने सहावी विकेट त्यांनी गमावली. त्यानंतर ७व्या षटकातच केनेथ वैसावाची (१) सातवी विकेट पडली आणि कर्णधार ब्रायन मसाबाच्या रूपाने संघाला आठवा धक्का बसला. त्यानंतर संघाला शेवटचे दोन धक्के ११व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉस्मास क्यूवुटा (१) आणि १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फ्रँक न्सुबुगा (००) यांच्या रूपाने बसले.

११ व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला जुमा मियागी नाबाद राहिला, त्याने २० चेंडूत १३* धावा केल्या. मियागी हा दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज होता.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा धुमाकूळ

वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेनने सर्वाधिक ५ बळी घेतले. यादरम्यान त्याने ४ षटकात २.८० च्या इकॉनॉमीसह ११ धावा दिल्या. याशिवाय अल्झारी जोसेफला २ विकेट मिळाले. अल्झारी जोसेफने २ षटकात केवळ ६ धावा दिल्या. रेस्ट रोमारियो शेफर्ड, आंद्रे रसेल आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Whats_app_banner