United States vs Canada, T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ ची सुरुवात अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. अमेरिकेने नुकताच बांगलादेशला हरवून इतिहास रचला होता. अशा स्थितीत अमेरिका या सामन्यात विजयाचा दावेदार असेल. हा सामना २ जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता होणार आहे.
हा सामना भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दिसणार आहे. तर अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारच्या माध्यमातून पाहता येईल.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज स्टुअर्ट लॉ हे अमेरिकेचे प्रशिक्षक आहेत. T20 विश्वचषकात पदार्पण करणारे संघ काही आश्चर्यकारक निकाल मिळवू शकतात.
वर्ल्डकपआधी अमेरिकेने बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळली होती. त्या मालिकेत अमेरिकेने पूर्ण सदस्य बांगलादेशचा २-१ असा पराभव करून आपला रंग दाखवला होता. तसेच, आपल्याला कमी लेखता येणार नाही हे दाखवून दिले होते.
यानंतर अलीकडेच अमेरिकेने कॅनडाचा ४-० असा पराभव केला होता.अमेरिका आणि कॅनडा ७ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या काळात अमेरिकेने पाचवेळा तर कॅनडाने दोनदा बाजी मारली आहे.
न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि २०१५ विश्वचषक संघाचा सदस्य कोरी अँडरसन अमेरिकन संघात आहे. अमेरिकन संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज मोनांक पटेल करेल. मोनांक हा गुजरातच्या आनंद येथे जन्मला आहे. मोनांक भारतात वयोगटातील क्रिकेट खेळला आहे, त्यानंतर तो २०१६ मध्ये अमेरिकेत स्थायिक झाला.
अमेरिकेच्या संघात मुंबई आणि राजस्थान रॉयल्सचा माजी डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंग आणि दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी फलंदाज मिलिंद कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्या संघात सौरभ नेत्रावलकरचाही समावेश आहे, जो अमेरिकेसाठी सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे.
तसेच, नितीश कुमार हा अष्टपैलू २०१२ ते २०१९ या कालावधीत कॅनडासाठी १८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला, पण आता तो अमेरिकन जर्सीमध्ये दिसणार आहे. त्याने या वर्षी एप्रिलमध्ये कॅनडाविरुद्ध अमेरिकेकडून टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
कॅनडाचा फिरकीपटू साद बिन जफरचा अफाट अनुभव आहे. कॅनडाच्या संघातील फक्त ४ खेळाडू ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
अमेरिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आरोन जोन्स, स्टीव्हन टेलर, नितीश कुमार, कोरी अँडरसन, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रावलकर, हरमीत सिंग, अँड्रिस गॉस, नॉस्टुश केन्झिगे/शॅडली व्हॅन शाल्क्विक.
कॅनडाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: नवनीत धालीवाल, आरोन जॉन्सन, परगट सिंग, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, निकोलस किर्टन, साद बिन जफर (कर्णधार), कलीम सना, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, जेरेमी गॉर्डन.
संबंधित बातम्या