मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs CAN : टी-20 विश्वचषकात अमेरिकेची धमाकेदार सुरुवात, १९५ धावांचं लक्ष्य १७ षटकात गाठलं

USA vs CAN : टी-20 विश्वचषकात अमेरिकेची धमाकेदार सुरुवात, १९५ धावांचं लक्ष्य १७ षटकात गाठलं

Jun 02, 2024 09:48 AM IST

T20 World Cup 2024, USA vs Canada Match Highlights : टी-0 विश्वचषक २०२४ च्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने कॅनडाचा पराभव केला. १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने १७.४ षटकांत विजय मिळवला.

USA vs Canada Match Highlights : टी-20 विश्वचषकात अमेरिकेची धमाकेदार सुरुवात, १९५ धावांचं लक्ष्य १७ षटकात गाठलं
USA vs Canada Match Highlights : टी-20 विश्वचषकात अमेरिकेची धमाकेदार सुरुवात, १९५ धावांचं लक्ष्य १७ षटकात गाठलं (AP)

T20 World Cup 2024 USA vs Canada : टी-20 विश्वचषक २०२४ आज रविवारपासून (२ जून) सुरु झाला आहे. पहिला सामना कॅनडा आणि यजमान अमेरिका यांच्यात डलास येथील क्रिकेट स्टेडियमवर झाला. दोन्ही संघांचा हा T-20 विश्वचषकातील पदार्पण सामना होता. 

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्या कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने १४ चेंडू बाकी असताना केवळ ३ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले आणि टी-20 विश्वचषकात शानदार सुरुवात केली. एकेकाळी अमेरिका आपल्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावून संघर्ष करत होती. पण ॲरॉन जोन्ससह अँड्रिज गॉसने सारा खेळच बदलून टाकला.

दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९.१ षटकात १२१ धावांची भागीदारी केली. अँड्रिज गॉसने ४६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. पण निखिल दत्ताने त्याला आरोन जॉन्सनकरवी झेलबाद केले. 

यानंतर अमेरिकेच्या ॲरॉन जोन्सने ४० चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९४ धावांची नाबाद खेळी करत कॅनडाचे मोठे लक्ष्य अगदी सोपे केले. कोरी अँडरसनने ३ धावा करून नाबाद राहिला. कॅनडाचा कर्णधार साद बिन जफरने अमेरिकेविरुद्ध ६ गोलंदाजांचा वापर केला, पण जोन्स आणि गॉसच्या फलंदाजांना रोखण्यात त्यांच्या एकाही गोलंदाजाला यश आले नाही.

फक्त डायलन हेलिगर हा प्रभाव पाडू शकला आणि त्याने ३ षटकात १९ धावा देत १ बळी घेतला. निखिल दत्ता आणि कलीम सना यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली. पण दोन्ही महागडे ठरले.

तत्पूर्वी, कॅनडाने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मोनांक पटेल आणि स्टीव्हन टेलर यांनी अमेरिकेच्या डावाची सुरुवात केली.

पण कॅनडाचा गोलंदाज कलीम सनाने पहिल्याच षटकात सलामीवीर टेलरला शुन्यावर एलबीडब्ल्यू आऊट करून अमेरिकेला धक्का दिला. मोनांक पटेलही फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही आणि १६ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १६ धावांची संथ खेळी करत डिलन हेलिगरचा बळी ठरला. श्रेयस मोव्वाने त्याची कॅप विकेटच्या मागे पकडली.

कॅनडाचा डाव

याआधी अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कॅनडाने २० षटकांत ५ गडी गमावून १९४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. 

कॅनडासाठी नवनीत धालीवालने ४४ चेंडूत ६१ धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर निकोलस किर्टनने ३१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. अली खानने त्याला कोरी अँडरसनकरवी झेलबाद केले. दिलप्रीत सिंग ५ चेंडूत ११ धावा करून धावबाद झाला. 

शेवटी श्रेयस मोव्वा १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा करून नाबाद परतला आणि डिलन हेलिगर १ धावा करून नाबाद परतला. अशाप्रकारे अमेरिकेला विजयासाठी १२० चेंडूत १९५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. 

अमेरिकन कर्णधार मोनांक पटेलने कॅनडाविरुद्ध ७ गोलंदाजांचा वापर केला. अली खान (४-४१-१), कोरी अँडरसन (३-२९-१) आणि हरमीत सिंग (४-२७-१) हे यशस्वी गोलंदाज होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४