अमेरिकेचा (USA) संघ कॅनडाविरुद्ध T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अमेरिकन क्रिकेट बोर्डाने १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात माजी भारतीय खेळाडू उन्मुक्त चंदला (Unmukt Chand) स्थान देण्यात आले नाही. संघात निवड न झाल्याने उन्मुक्त चंदने यूएसए क्रिकेटवर टीका केली आहे.
उन्मुक्त चंदने बांगलादेश प्रीमियर लीग (BPL), मेजर लीग क्रिकेट (MLC) आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) यासह जगभरातील विविध T20 लीगमध्ये आपला ठसा उमटवला आहे. मेजर लीग क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. उन्मुक्तने ४५ डावात १५०० धावा केल्या आहेत. मात्र, चांगली कामगिरी करूनही तो यूएसएच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकला नाही.
यानंतर त्याने क्रिकेट बोर्डावर टीका करताना लिहिले आहे की, ‘आयुष्यातील विडंबना पाहा, मी लोकांना वाईट व्यवस्थेबद्दल आणि खऱ्या बदलांची गरज असल्याच्या तक्रारी करताना एकले आहे. पण जेव्हा तेच लोक सत्तेवर येतात आणि तेव्हा तेही त्याच अन्यायकारक पद्धतीने वागतात. हे पाहून वाईट वाटते. त्यामुळे आता स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची आणि स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहण्याची आली वेळ आहे’.
यूएसए संघात निवड न झाल्याने उन्मुक्त चंदचे यंदाचे टी-२० विश्वचषक खेळण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे. कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील टी-२० मालिका ७ एप्रिलपासून ह्युस्टनमध्ये खेळवली जाणार आहे. मोनांक पटेल अमेरिकन संघाचे नेतृत्व करणार आहे. तर ॲरॉन जोन्स उपकर्णधार असेल.
कोरी अँडरसन, मिलिंद कुमार आणि हरमीत सिंग यांना संघाकडून बोलावणे आले आहे. अँडरसन ६ वर्षे न्यूझीलंडकडून खेळला आहे. सर्वात वेगवान एकदिवसीय शतकाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मिलिंद आणि हरमीत आयपीएलमध्ये बेंगळुरू आणि राजस्थानचा भाग राहिले आहेत.
मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उप-कर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, गजानंद सिंग, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर , उस्मान रफिक
संबंधित बातम्या