T20 World Cup 2024 Semifinal Scenario : टी-20 विश्वचषक २०२४ मधील सुपर-८ चा ग्रुप एक रोचक झाला आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर सर्व समीकरणे बदललेली दिसत आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गट १ मध्ये भारत सध्या ४ गुणांसह अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. अशा स्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या या पराभवाचा भारतीय संघाला काही धोका होऊ शकतो का? ते जाणून घेऊया.
सुपर-८ च्या पहिल्या गटात, टीम इंडियाने २ सामन्यात २ विजयानंतर ४ गुण जमा केले आहेत आणि त्यांचा नेट रनरेट +२.४२५ आहे. ऑस्ट्रेलिया २ गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर अफगाणिस्तान केवळ २ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पण त्यांच्या नेट रनरेटमध्ये खूप फरक आहे. दुसरीकडे, बांगलादेशने आतापर्यंत आपले दोन्ही सामने गमावले आहेत, त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग आता जवळपास अशक्य झाला आहे.
सुपर-८ मध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला तरी उपांत्य फेरीत जाऊ शकतो. पराभव झाल्यास भारताला कांगारू संघाविरुद्ध मोठ्या फरकाने हरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
त्याचबरोबर अफगाणिस्तानने बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करू नये, अशीही प्रार्थना करावी लागेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊनही टीम इंडिया उपांत्य फेरीत जाऊ शकते.
नेट रनरेटमुळे भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. अशा स्थितीत दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. जर ऑस्ट्रेलिया भारताकडून हरला, तर ऑस्ट्रेलियाला प्रार्थना करावी लागेल की अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना गमवावा आणि बांगलादेशचा विजयाचे अंतर देखील कमी असावे.
तसेच, कांगारू संघ जिंकला तरी उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान लगेच निश्चित होणार नाही. कारण त्यांना बांगलादेश-अफगाणिस्तानचा निकाल पाहावा लागेल. अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवले तरी त्या विजयाचे अंतर कमी असावे, अशी प्रार्थना ऑस्ट्रेलियाला करावी लागेल.
संबंधित बातम्या