आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेस्ट इंडिज आणि USA मध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक २०२४ ची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. या विश्वचषक स्पर्धेत जगातील विविध २० देशांचे संघ सहभागी होत आहेत.
टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून २.४५ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात अंदाजे २०.४ कोटी रुपये दिले जातील.
उपविजेते पदासाठी बक्षिसाची रक्कम १.२८ मिलियन अमेरिकन डॉलर्स ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार उपविजेत्या संघाला अंदाजे १०.६ कोटी रुपये दिले जातील. चांगली गोष्ट म्हणजे या स्पर्धेत खालच्या क्रमांकावर राहणाऱ्या देशांनाही स्पर्धेतील सहभागासाठी मानधन रक्कम दिली जाईल.
ICC ने T20 विश्वचषक २०२४ साठी एकूण ९३.५ कोटी रुपयांचा बक्षीस निधी तयार केला आहे. विजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणार असला, तरी उपांत्य फेरीतील आणि शेवटच्या स्थानावर असलेल्या संघालाही बक्षीस निधीतून काही रक्कम दिली जाईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा हा उपक्रम महत्त्वाचा आहे कारण युगांडा, पापुआ न्यू गिनीसह अनेक सहयोगी देशांमध्ये क्रिकेटचा खेळ संघर्षमय स्थितीत आहे आणि आयसीसीने दिलेला निधी तेथील क्रिकेटला चालना देण्यासाठी मदतीचा ठरेल.
टी-20 विश्वचषक २०२४ च्या विजेत्या संघाला २०.४ कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला १०.६ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर उपांत्य फेरीतील संघांना सुमारे ६.५४ कोटी रुपये मिळतील. सुपर-८ टप्प्याच्या पुढे न जाणाऱ्या प्रत्येक संघाला ३.१७ कोटी रुपये दिले जातील.
९व्या ते १२व्या स्थानावर असलेल्या प्रत्येक संघाला सुमारे २.०५ कोटी रुपये मिळतील. १३व्या ते २०व्या स्थानावर असलेल्या संघांसाठीही आनंदाची बातमी आहे. कारण शेवटच्या ८ स्थानी असलेल्या प्रत्येक संघाला सुमारे १.८७ कोटी रुपये मिळतील.
संबंधित बातम्या