Rohit Sharma Missing on T20 World Cup Poster : आयसीसीने आगामी टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक (T20 World Cup 2024 schedule announced) जाहीर केले आहे. हा टी-20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे.
भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारत-पाकिस्तान महामुकाबला ९ जून २०२४ रोजी खेळला जाणार आहे.
टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण ४ सामने खेळणार आहे. १ जूनपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना १ जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
दरम्यान, टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा वाद वर्ल्डकप पोस्टवर असलेल्या चेहऱ्यांवरून सुरू झाला आहे.
वास्तविक, टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक समोर आल्यानंतर या स्पर्धेचे अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने एक पोस्टर जारी केले. भारत-पाकिस्तान सामन्याचे हे पोस्टर सोशल मीडियावर अपलोड होताच रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे चाहते एकमेकांना भिडले आहेत.
वर्ल्डकपच्या पोस्टरवर पाकिस्तानचा टी-20 कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आणि हार्दिक पांड्याचा फोटो लावण्यात आला आहे. पोस्टरवर हार्दिकचा फोटो असणे, रोहित शर्माच्या फॅन्सना आवडलेले नाही.
या पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोबतच विश्वचषकात बीसीसीआय हार्दिक पांड्याला कर्णधार बनवणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
IPL २०२४ साठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केले आहे, त्यावेळीही रोहित शर्माच्या फॅन्सनी मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते.
दरम्यान, टी-20 वर्ल्डकप २०२४ सुरू होण्यासाठी अद्याप ६ महिन्यांचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकासाठी संघ कसा असेल हे आताच सांगता येत नाही. पण रोहित आणि हार्दिक पंड्याचे फॅन्स मात्र, आतापासूनच जोशात आले आहेत.
टीम इंडियाचे बहुतेक सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू होतील. उपांत्य फेरीचे सामने गयाना आणि त्रिनिदाद येथ २६ आणि २७ जून रोजी खेळवले जातील, तर फायनल २९ जून रोजी बार्बाडोस येथे खेळली जाईल.
अ गट - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
आगामी T20 विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आधी २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशा ४ गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.
संबंधित बातम्या