मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वर्ल्डकपमध्ये हे दोन मोठे संघ पहिल्याच फेरीत गारद होणार? ग्रुप डी बनलाय 'ग्रुप ऑफ डेथ', पाहा

वर्ल्डकपमध्ये हे दोन मोठे संघ पहिल्याच फेरीत गारद होणार? ग्रुप डी बनलाय 'ग्रुप ऑफ डेथ', पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 06:52 PM IST

T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तानला एकाच अ गटात आहेत. हा गट तुलनेने कमकुवत म्हणता येईल, पण या विश्वचषकाचा 'ड' गट एकप्रकारे 'ग्रुप ऑफ डेथ' बनला आहे.

T20 World Cup 2024 group D
T20 World Cup 2024 group D (PTI)

T20 World Cup 2024 Group Of Death : आगामी टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्वचषकाचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात १ जून रोजी होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ जून रोजी होणार आहेत. तर बार्बाडोस येथे २९ जून रोजी अंतिम सामना रंगणार आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवसदेखील ठेवण्यात आले आहेत.

कोणता संघ कोणत्या गटात?

अ गट - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा फॉरमॅट

आगामी T20 विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशा ४ गटात विभागलण्यात आले आहे. यानंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

ड ग्रुप बनलाय 'ग्रुप ऑफ डेथ

अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तानला एकाच अ गटात आहेत. हा गट तुलनेने कमकुवत म्हणता येईल, पण या विश्वचषकाचा 'ड' गट एकप्रकारे 'ग्रुप ऑफ डेथ' बनला आहे.

'ग्रुप ऑफ डेथ' म्हणजे थोडा सर्वात कठीण गट. एक प्रकारे सर्वच मजबूत संघ या गटात असतात. त्यामुळे काही मोठे संघ पहिल्याच फेरीत वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण होतोच.

नेदरलँड्स मोठ्या संघांची शिकार करण्यात माहीर

वर्ल्डकपच्या ड गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ यांचा समावेश आहे. नेपाळ एशियन गेम्स आणि आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करताना दिसला. त्याच वेळी, नेदरलँड्स कोणत्या संघाचा बँड कधी वाजवेल हे सांगता येत नाही. या गटातील हे दोन अंडरडॉग संघ आहेत.

विशेष म्हणजे, २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा आणि झिम्बाब्वेचा धुव्वा उडवला होता.

त्यााआधी नेदरलँड्सने २००९ आणि २०१४ टी-20 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला दोनदा पराभूत केले होते. 

तसेच, भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सने आफ्रिकेचा आणि बांगलादेशचा पराभव करून खळबळ माजवली होती. अशा स्थितीत नेदरलँडला अजिबात कमकुवत मानता येणार नाही. 

या संघात कर्णधार स्कॉट एडवर्ड्ससह मॅक्स ओ'डॉड, विक्रमजीत सिंग, तेजा निदामनरू सारखे दिग्गज फलंदाज आहेत. गोलंदाजीत बास डी लीडे, लोगान व्हॅन विक आणि आर्यन दत्त आहेत.

नेपाळचा संघही कमी नाही

नेपाळी संघाला मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे, २०१४ मध्ये त्यांनी अफगाणिस्तानला एकमेव टी-20 सामन्यात पराभूत केले होते. सध्या नेपाळी संघात अनेक दमदार खेळाडू आहेत. हे खेळाडू एकहाती सामना फिरवण्याची क्षमता राखतात. 

नेपाळकडे फलंदाजीत असिफ शेख, रोहित पौडेल, कुशल भुरथेल, कुशल मल्ला यांसारखे खेळाडू आहेत तर गोलंदाजीत करण केसी, ललित राजवंशी, अविनाश बोहरा, सोमपाल कामी यांचा समावेश आहे.

यामुळे ड गटातील संघांना विशेषत: दक्षिण आफ्रिकेला सतर्क राहावे लागेल कारण त्यांना मोठ्या स्पर्धांमध्ये चोकर म्हटले जाते. श्रीलंका आणि बांगलादेशलाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi