अमेरिकन सोशल मीडिया स्टार डॅरेन जेसन वॅटकिन्स जूनियर हा क्रिकेटर विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. डॅरेन जेसन वॅटकिन्स जूनियर याला सोशल मीडियावर 'आय शो स्पीड' या नावाने ओळखले जाते. हा अमेरिकन स्टार अनेकदा त्याच्या व्हिडिओंमध्ये कोहलीची स्तुती करताना दिसतो.
अशातच आता आय शो स्पीड हा स्वीडनचा महान फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचसोबत प्रवास करताना दिसला. या प्रवासादरम्यान 'आय शो स्पीड'ने इब्राहिमोविचला विराट कोहलीबद्दल विचारले. यावरील इब्रामहिमोविचची विचित्र प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
'iShow Speed' ने झ्लाटन इब्राहिमोविचला विचारले की तो विराट कोहलीला ओळखतो का, यावर स्वीडिश फुटबॉलपटूने उत्तर दिले, "कोण, विराट कोहली? मी कधी क्रिकेटही पाहिले नाही, कोहली तर सोडूनच दे. मला कोणाचाही अपमान करायचा नाही, पण मी खरंच त्याला ओळखत नाही. माहित नाही तो कोण आहे?"
यानंतर, अमेरिकन सोशल मीडिया स्टार आय शो स्पीडने कोहलीचे कौतुक करताना म्हटले की, "विराट हा महान खेळाडू आहे, मी क्रिकेट पाहतो आणि तो त्याच्या खेळात निपुण आहे तो GOAT आहे."
क्रिकेट हा खेळ पाश्चिमात्य देशांमध्ये फारसा लोकप्रिय नाही. पण तरीही ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो नाझारियोने कोहलीला ओळखले. 'iShow Speed' ने त्याला विराट कोहलीचा फोटो दाखवताच नाझारियोने त्याला ओळखले आणि कोहलीला एक महान खेळाडू म्हणून संबोधले.
दरम्यान, आय शो स्पीड भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा सामना पाहण्यासाठी नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये देखील आला होता. तो टीम इंडियाच्या जर्सीत दिसला होता. त्या लढतीत कोहली लवकर बाद झाल्याने 'आय शो स्पीड' खूपच निराश झाला. पण टीम इंडियाने तो सामना ६ धावांनी जिंकला होता.
संबंधित बातम्या