Suryakumar Yadav Appointment as Team India T20i Captain: भारताच्या टी-२० संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार? असा प्रश्न चाहत्यांसह अनेकांना पडला होता. भारताच्या नव्या टी-२० संघाच्या कर्णधारापदासाठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. अखेर बीसीसीआयने सूर्यकुमारच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यानंतर सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, जी प्रचंड व्हायरल होत आहे.
देविशा म्हणाली की, भारताच्या श्रीलंका दोऱ्यातील टी-२० मलिकेत सूर्यकुमारची कर्णधार म्हणून निवड होणे, खूप अनपेक्षित होते. हे सूर्याच्या मेहनतीचे फळ असल्याचेही तिने म्हटले आहे. देविशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, जेव्हा तू भारतासाठी खेळायला सुरुवात केली, त्यावेळी आम्ही कधीच असा विचारला केला नव्हता की, हा दिवस पाहायला मिळेल. आमचा देवावर विश्वास आहे. प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ मिळते. मला तुझा अभिमान आहे. तू खूप लांबचा पल्ला गाठला आहेस, पण ही सुरुवात आहे, अजून तुला खूप काही साध्य करायचे आहे.
दुसरीकडे सूर्यकुमार यादवने भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागल्याने आनंद व्यक्त केला. गेल्या काही आठवड्यांचा प्रवास एखाद्या स्वप्नासारखाच आहे, असे सूर्यकुमारने म्हटले. बीसीसीआयने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि चाहत्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल त्याने आभार मानले. सूर्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, 'तुमच्याकडून मिळालेले प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी खूप- खूप धन्यवाद. मागील काही आठवडे एखाद्या स्वप्नासारखे आहेत. खरेच मी सर्वांचा खूप आभारी आहे.'
पुढे सूर्यकुमार म्हणाला की, ‘देशाचे प्रतिनिधित्व करण्यामागची भावना वेगळीच असते, जे शब्दांत व्यक्त करता येऊ शकत नाही. आता माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल. तुमच्याकडून असाच पाठिंबा आणि आशिर्वाद मिळत राहील, अशी अपेक्षा करतो. देवावर आमचा विश्वास आहे.’
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरगुती टी-२० मालिका खेळली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने भारताचे नेतृत्व केले. सूर्यकुमारने आतापर्यंत दोन मालिकांमध्ये आठ टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या ८ टी-२० सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, एक सामना अनिर्णित ठरला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला २७ जुलै २०२४ सुरुवात होणार आहे. श्रीलंका विरुद्धची टी-२० मालिका सूर्यकुमारसह भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसाठीही खूप खास असेल. या मालिकेपासून गंभीर भारतीय संघाचे मुख्यप्रशिक्षकपद संभाळणार आहे.
संबंधित बातम्या