टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून इतिहास रचला. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या झेलने सामना फिरवला. सूर्याने डेव्हिड मिलरचा झेल घेत भारताचा विजय निश्चित केला.
आता गुजरातच्या वापी शहरातून एक फोटो समोर आला आहे, यात सूर्यकुमार यादवच्या वर्ल्ड कप कॅचवर आधारित भगवान गणेशासमोर एक देखावा तयार करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खुर्चीवर गणेशाची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यानंतर मूर्तीच्या मागे भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचे पोस्टर लावण्यात आले आहे. तर गणपतीच्या समोर क्रिकेटचे मैदान बनवण्यात आले आहे आणि त्यात सूर्यकुमार यादव झेल घेताना दिसत आहे. हा देखावा पुठ्ठ्यापासून तयार करण्यात आला आहे.
यामध्ये डेव्हिड मिलरचा तो फटका आणि सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर घेतलेला झेल दाखवण्यात आला आहे. आता गणेश पूजेच्या थीममध्ये वर्ल्ड कप कॅच दाखविणे लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या या झेलने अंतिम सामन्याचा निकाल पूर्णपणे भारताकडे वळवला होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावा करायच्या होत्या आणि चेंडू हार्दिक पांड्याकडे होता.
हार्दिकने पहिल्याच चेंडूवर फुल टॉस टाकला, ज्यावर डेव्हिड मिलरने खूप वेगाने बॅट फिरवली. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनीही सांगितले आहे की त्यांच्या मते चेंडू सीमारेषेपलीकडेच जाणार होता.
पण तेवढ्यात, सूर्याने धावत जाऊन झेल घेतला. यानंतर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये सूर्यकुमारच्या पायाचा एक छोटासा भाग सीमारेषेला स्पर्श करत असल्याचा दावा करण्यात आला. यावर क्रिकेट विश्व दोन गटात विभागले गेले होते, परंतु काही दिवसांनी एक नवीन व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये सूर्यकुमारचा झेल पूर्णपणे क्लीन असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
संबंधित बातम्या