आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या लिलावापूर्वी आयपीएल संघ अनेक स्टार खेळाडूंना रीलीज करतील. त्यामुळे अनेक खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. आता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
एका रिपोर्टनुसार मुंबईचा संघ विखुरला जाणार आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्सने सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदाची ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूर्याने मुंबई इंडियन्सला सोडल्यास तो केकेआरमध्ये जाऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सूर्या २०१८ पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. सूर्याला २०१८ ते २०२१ पर्यंत ३.२० कोटी रुपये पगार मिळत होता. त्यानंतर २०२२ मध्ये पगार वाढवण्यात आला. आता त्याला ८ कोटी रुपये मिळतात.
मात्र आता मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रीलीज केले केले तर कोलकाता नाईट रायडर्स त्याच्यावर मोठी बोली लावू शकतो. एका स्पोर्ट्स वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, केकेआरने सूर्याला कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते. संघाने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले. हार्दिक कर्णधार बनल्यानंतर संघात बरेच बदल झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यासह अनेक खेळाडू पंड्याला कर्णधार बनवल्याने खूश नव्हते. पांड्याची कर्णधारपदाची शैली खेळाडूंना आवडली नाही. यामुळे रोहितही नाराज होता. मात्र, मुंबई कोणाला सोडते आणि कोणाला नाही हे आताच सांगता येणार नाही.
सूर्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. तो एक स्फोटक फलंदाज आहे. सूर्याने २०२३ मध्ये १६ सामन्यात ६०५ धावा केल्या होत्या. या काळात त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. सूर्याने आतापर्यंत आयपीएलचे १५० सामने खेळले आहेत.
यात त्याने ३५९४ धावा केल्या आहेत. सूर्याने या लीगमध्ये २ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्याला कर्णधारपदाचा अनुभवही आला आहे. सूर्याने T20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.