रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला पराभूत करून आश्चर्यकारक कामगिरी केली. सध्या सर्वत्र फक्त टीम इंडियाचीच चर्चा होत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.
पण भारतीय गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांचा राहिला, दोघांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी हातातून गेलेला सामना परत आणला.
भारताने हा सामना ६ धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यातील काही खेळाडूंची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. त्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचेही नाव आहे.
भारताचा अनुभवी आणि मिस्टर ३६० डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट पाकिस्तानविरुद्ध कधीच चालत नाही. पाकिस्तानविरुद्ध सूर्याला काय होते, हे सर्वांच्याच समजण्यापलीकडे आहे.
आयसीसी टी-20 क्रमवारीत यादव पहिल्या क्रमांकावर आहे. तो एक अतिशय धोकादायक फलंदाज आहे, त्याच्याकडे कधीही सामना फिरवण्याची ताकद आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवच्या बॅटला गंज लागल्याचे दिसून येते.
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले असून त्यात त्याने केवळ ६४ धावा केल्या आहेत. जेव्हा सूर्यकुमार यादव पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला. त्यावेळी समालोचक सूर्या मोठे फटके मारण्यात माहीर असल्याचे सांगत होते. पण यादवची बॅट शांत राहिली. तो ८ चेंडूत केवळ ७ धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद आमीरने झेलबाद केले.
३३ वर्षीय सूर्यकुमार यादवने २०२१ पासून भारतासाठी एकूण ६२ T20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १७० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ४३ च्या सरासरीने २१५० धावा केल्या आहेत. भारताकडून T20 मध्ये खेळताना त्याने ४ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत.
मात्र, आयसीसीच्या मेगा इव्हेंटमध्ये सूर्याला अद्याप स्वत:ला सिद्ध करण्यात यश आलेले नाही. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात आणि २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही तो आपल्या फलंदाजीने फारसा प्रभाव पाडू शकला नाही. आता या विश्वचषकात सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या