इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाबाबत अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आयपीएल २०२५ मध्ये अनेक मोठे खेळाडू इतर संघांसाठी खेळताना दिसू शकतात. कारण आगामी आयपीएलपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. अशा स्थितीत अनेक संघाचे खेळाडू लिलालावत उतरू शकतात आणि इतर संघांत सामील होऊ शकतात.
दरम्यान, सध्या अशी चर्चा सुरू आहे, की राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होणार आहे. तसेच, मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात जाणार आहे. या वृत्तांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव आता फ्रँचायझी सोडण्याच्या मूडमध्ये आहे. भारताच्या T20 संघाचा कर्णधार आता आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारणार असल्याचा असा दावा करण्यात आला आहे. दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये असेही समोर आले आहे की, संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.
तर शिवम दुबे चेन्नईहून राजस्थान रॉयल्समध्ये जाणार आहे. केएल राहुल देखील लखनौ सुपर जायंट्स सोडून आरसीबीमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.
बरं, या बदलांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिपोर्ट आणि सूत्रांच्या आधारे हे सर्व दावे करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही फ्रँचायझी, बीसीसीआय किंवा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही.
अद्यापपर्यंत आयपीएलकडून खेळाडूंच्या रिटेन्शन नियमाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की यावेळी सर्व संघ ४ खेळाडूंना रिटेन करू शकतील. तसेच, दोन खेळाडूंवर आरटीएम वापरण्यास सक्षम असतील.
आयपीएलच्या नियमांनुसार, मेगा लिलावापूर्वी सर्व संघ प्रत्येकी ४ खेळाडूंना रिटेन करू शकतात. उर्वरित सर्व खेळाडूंना रीलीज करावे लागेल. याशिवाय लिलावापूर्वी संघ आपापसात व्यापारही करू शकतात. यामध्ये खेळाडूंची देवाणघेवाण करता येते. तसेच, संघ दुसऱ्या संघाकडून खेळाडू विकत घेऊ शकतो.