भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे. टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. भारत-बांगलादेश मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. क्षेत्ररक्षण करताना सूर्याला दुखापत झाली.
ESPNcricinfo मधील वृत्तानुसार, कोईम्बतूर येथे मुंबई आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन XI यांच्यातील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव जखमी झाला.
या सामन्यात सूर्या केवळ ३८ चेंडूच मैदानावर राहू शकला आणि त्यानंतर तो दुखापग्रस्त झाला. या दुखापतीनंतर सूर्याच्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुलीप करंडक स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्या हा दुलीप ट्रॉफीमधील 'सी' संघाचा भाग आहे.
मात्र, सूर्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुन्हा केव्हा मैदानात परतेल याबाबत कोणतीही माहिती नाही.
सूर्याला श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा टी-20 कर्णधार बनवण्यात आले होते. ६ ऑक्टोबरपासून बांगलादेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी सूर्या उपलब्ध असेल की नाही याबाबत कोणतेही अपडेट मिळालेले नाही. आता तो मैदानात कधी परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सूर्यकुमार यादवने भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'द हिंदू'शी बोलताना सार्या म्हणाला, होता की "रेड बॉल क्रिकेटला नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे.
मी १० वर्षांहून अधिक काळ अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला आहे आणि मला अजूनही कसोटी फॉरमॅटमध्ये खेळण्याचा आनंद मिळतो. त्याबद्दल कोणताही प्रश्न नाही आणि म्हणूनच मी दुलीप करंडक स्पर्धेपूर्वी येथे आलो आहे.”