Suryakumar Yadav Record: टी-२० संघाचा नवनियुक्त कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत गौतम गंभीर युगाची यशस्वी सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या सहा षटकांत ७४ धावांची धमाकेदार भागीदारी झाल्यानंतर सूर्यकुमारने अवघ्या २६ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताच्या डावाची दिशा निश्चित केली. या तिघांनी भारताला ७ बाद २१३ धावांपर्यंत मजल मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या संघावर प्रचंड दडपण आणले.
श्रीलंकेने १५ व्या षटकापर्यंत स्पर्धात्मक राहून फलंदाजीने कौतुकास्पद झुंज दिली. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात संथ खेळपट्टीच्या परिस्थितीशी जुळवून घेत भारतीय गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. सुरुवातीच्या प्रतिकारानंतरही फिरकीपटू अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि नवोदित रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी मिळून सहा बळी घेत श्रीलंकेची फलंदाजी मोडीत काढली. २ बाद १४९ धावांवर आश्वासक स्थितीत असलेल्या श्रीलंकेचा संघ अवघ्या २१ धावांत सात गडी गमावून कोसळला आणि भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावर ताबा मिळवला.
या दमदार कामगिरीनंतर सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषित करण्यात आले, ज्यामुळे त्याने भारताचा माजी टी-२० स्टार विराट कोहलीची बरोबरी केली. भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या ३५ वर्षीय खेळाडूच्या नावावर १६ सामनावीर पुरस्कार होते. सूर्यकुमारने आता ५६ कमी सामन्यांत कोहलीची बरोबरी केली असून भारतीय संघासोबत कर्णधारपदाच्या कारकिर्दीला भक्कम सुरुवात केली आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू पाहा:
१) सूर्यकुमार यादव (भारत) - १६ (६९ सामन्यांत
२) विराट कोहली (भारत) - १६ (१२५ सामन्यांत
३) सिकंदर रझा (झिम्बाब्वे) - १५ (९१ सामन्यांत)
४) मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) - १४ (१२९ सामन्यांत
५) रोहित शर्मा (भारत)- १४ (१५९ सामन्यांत)
सूर्यकुमारने २०२१ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग आहे. गेल्या वर्षी हा फलंदाज आयसीसी रँकिंगमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचला. टीम मॅनेजमेंटमध्ये बदल झाल्यानंतर सूर्यकुमारची भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या आधी त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
संबंधित बातम्या