भारतीय टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा आज (१४ सप्टेंबर) वाढदिवस आहे. चाहत्यांमध्ये सूर्या, स्काय आणि मिस्टर ३६० अशी ओळख असलेला हा क्रिकेटर आज ३४ वर्षांचा झाला. उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सूर्यकुमार यादव याचा प्रवास एखाद्या सोनेरी स्वप्नापेक्षा कमी नाही.
लहानपणापासूनच त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटनची आवड होती, पण एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला दोन खेळांपैकी एक निवडण्यास सांगितले, सूर्याने क्रिकेट निवडले, बाकी मग इतिहास आहे.
सूर्यकुमार यादव याचे काका विनोद यादव हे त्याचे पहिले क्रिकेट प्रशिक्षक होते. जेव्हा सूर्या १० वर्षांचा होता, तेव्हा त्याचे कुटुंब वाराणसीहून मुंबईत आले आणि त्याच वर्षी त्याने आपल्या शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
सूर्याचे वडील सरकारी खात्यात अभियंता होते. मुंबईतील दिलीप वेंगसरकर यांच्या 'वेंगसरकर क्रिकेट अकादमी'मधून त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. २०१० मध्ये प्रथम श्रेणी हंगामात मुंबईकडून खेळताना त्याने दिल्लीविरुद्ध ८९ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादव हा पहिल्यांदा पत्नी देविशा हिला २०१० मध्ये भेटला होता. दोघेही पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये शिकले. सूर्याने तोपर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. देवीशा कॉलेजच्या एका फंक्शनमध्ये डान्स करत होती, त्यावेळी सूर्याने तिला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला.
सुरुवातीला दोघंही बोलत नसत, पण हळूहळू ते एकमेकांना ओळखू लागले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी मे २०१६ मध्ये लग्न केले.
२०१२ च्या आयपीएल हंगामात सूर्याला पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड सारख्या दिग्गजांना प्रभावित करण्यात तो अपयशी ठरला.
पण, वेगवान गोलंदाजांविरुद्ध डीप स्क्वेअर लेगवर षटकार मारण्याच्या अप्रतिम क्षमतेसाठी आणि त्याची सिग्नेचर शॉट स्वीप शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या सूर्याचे टॅलेंट कोलकाता नाइट रायडर्सचा तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरने हेरले.
गंभीरने सूर्याला संघात घेतले, तो केकेआरचा उपकर्णधारही होता, पण नंतर मुंबई इंडियन्सने त्याचा पुन्हा आपल्या संघात समावेश केला. आज तो संघाचा प्राण आहे.
सूर्यकुमार यादवला आतापर्यंत भारतासाठी १ कसोटी, ७१ टी-20 आणि ३७ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. नुकतीच टी-20 संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या सूर्याने या फॉरमॅटमध्ये ४२.६६ च्या सरासरीने २४३२ धावा केल्या, ज्यात ४ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-20 क्रमवारीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण त्याची वनडेतील कारकीर्द अतिशय सामान्य राहिली आहे. त्याला २५.७६ च्या सरासरीने केवळ ७७३ धावा करता आल्या आहेत.